तुकाराम गोवेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सासष्टी तालुका हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. संपूर्ण गोव्याचे राजकारण या तालुक्यावर अवलंबून होते. मात्र, आता कालचक्र बदलले आहे. एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात आठपैकी काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे. यामुळे भाजपने बालेकिल्ल्यातच काँग्रेसला आव्हान दिले आहे; पण आमदार भाजपकडे वळले तरी येथील मतदार कोणाच्या बाजूला राहतात, हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल.
सासष्टी तालुक्यात आठ मतदारसंघ येतात. यात मडगाव, नावेली, वेळ्ळी, बाणावली, कुंकळ्ळी, नुवे, कुडतरी व फातोर्डा मतदारसंघांचा समावेश आहे. एकेकाळी आठही आमदार काँग्रेस पक्षाचे असायचे. आज केवळ कुंकळ्ळीमध्ये काँग्रेसचे युरी आलेमांव आमदार आहेत तसेच ते विरोधी पक्षनेतेही आहेत.
मडगाव, नावेली व नुवे मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. नुवेतील आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केला आहे. ते भाजप सरकारात कायदामंत्री आहेत. मडगावातील आमदार दिगंबर कामत यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. आमदार कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स ज्यांनी सत्ताधारी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे, हे तिघे भाजपच्या प्रचार कार्यात झोकून देऊन काम करीत आहेत.
बाणावली व वेळ्ळी मतदारसंघात आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा व बाणावलीचे व्हॅझी व्हिएगस हे इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या प्रचारात भाग घेऊन फर्नांडिस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई हे देखील प्रचारात सक्रिय आहेत. कॅप्टन विरियातोंसाठी ते प्रचार करीत आहेत.
आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत सासष्टी तालुक्यातून १९ हजार १४४ मते मिळवली होती. आता आम आदमी पक्ष काँग्रेससोबत आहे. आरजी पक्षाला विधानसभा निवडणुकीत २० हजार ४२ मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत ते किती मते मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वेळ्ळी मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला लिड मिळाले होते. कुंकळ्ळी व वेळ्ळी मतदारसंघांत इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या सभांना मिळणार प्रतिसाद पाहता, ते कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आरजी किती मते खेचणार, यावर ते लिड अवलंबून राहील.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाने कुंकळ्ळीत २२२६, वेळळीमधून ३६५३ मते घेतली. निवडणुकीत कुंकळ्ळीमधून काँग्रेसला १०,०५० तर भाजपला ७४३९ मते प्राप्त झाली होती. आम आदमी पक्षाने २०१९ मध्ये एल्वीस गोम्स यांना लोकसभा निवडणुकीत उतरविले होते, तरीही वेळ्ळी मतदारसंघातून काँग्रेसला १०२६० मते मिळाली होती.
भाजपने २०१४ मध्ये मारली होती बाजी
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मडगाव व फातोर्डा मतदारसंघातून लिड मिळाली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर निवडून आले होते. भाजपच्या उमेदवाराला सासष्टी तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघातून चार हजारांहून अधिक मते मिळाली होती. नुवे मतदारसंघातून ५ हजार ३२१ मते भाजपला मिळाली होती. आता नुवे मतदारसंघातून मंत्री सिक्वेरा किती मते भाजपला मिळवून देतात हे पाहावे लागेल.