दक्षिणेत भाजप-काँग्रेस लढत होणार चुरशीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 09:41 AM2024-05-06T09:41:52+5:302024-05-06T09:44:01+5:30
भाजप प्रचाराच्या चार फेऱ्या, काँग्रेसला वेळ कमी
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : दक्षिण गोव्यात भाजप व काँग्रेस पक्षामध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. दक्षिण गोव्यातून इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, भाजपाच्या उमेदवार पल्लवी धेपे, आरजीचे उमेदवार रुबर्ट परेरा, डॉ. श्वेता गावकर, दीपकुमार मापारी, हरिश्चंद्र नाईक, आलेक्सी फर्नांडिस, डॉ. कालिदास वायंगणकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार असून त्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.
दक्षिण गोव्यात लोकसभा जाहीर प्रचाराची काल सायंकाळी ५ वाजता सांगता झाली. मंगळवारी मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दोन दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा सांकवाळ येथे घेण्यात आली होती. भाजपाने प्रचाराच्या एकूण चार फेऱ्या पूर्ण केल्या. मात्र, काँग्रेसचा उमेदवार उशिरा जाहीर झाल्याने त्यांना प्रचार करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कोपरा बेठका व घरोघरी प्रचारावर भर दिला. इंडिया आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने ज्या स्टार प्रचारकांची यादी दिली होती, त्यातील केवळ शशी थरूर व पवन खेरा हे केंद्रीय पातळीवरील दोनच नेते आले. थरूर यांनी दक्षिण गोव्यात, तर पवन खेरा यांनी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली.
भाजपाने शनिवारी मडगावात रोड शो केला. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर भाजपाच्या उमेदवार पल्लवी धेंपे उपस्थित होत्या.
प्रचारात आघाडीवर
दक्षिण गोव्यात भाजपा एवढा प्रचार कुठलाही पक्ष करू शकला नाही. भाजपाचे कार्यकर्ते तसेच भाजपाच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारसंघात, पंचायत क्षेत्राला भेट देऊन प्रचार केला. तसा प्रचार इंडिया आघाडीच्या उमेदवाराने किंवा इतर कुठल्याही उमेदवाराने केला नाही. दक्षिण गोव्यातील मतदारांची संख्या ५ लाख ९८ हजार ९३४ एवढी आहे.