पणजी : भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण आणखी करू नये, कारण त्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले जातात, अशा प्रकारचा सल्ला भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीत काही सदस्यांनी दिला.
भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर, दामू नाईक, सतिश धोंड, संजीव देसाई, दत्ता खोलकर, सदानंद शेट तानावडे हे सदस्य आहेत. पूर्वी फ्रान्सिस डिसोझा व मनोहर पर्रीकर हे दोघे सदस्य असायचे. त्यांच्या निधनानंतर कोअर टीमवरील दोन पदे रिक्त झाली.
2017 सालची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाने काँग्रेसमधून विश्वजित राणे यांना भाजपामध्ये प्रवेश दिला. वाळपईत व पर्ये मतदारसंघातही त्यामुळे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते हताश झाले. अलिकडेच भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीनपैकी दोन आमदारांना त्या पक्षातून बाहेर काढले व भाजपामध्ये प्रवेश दिला. ही प्रक्रिया मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पार पडल्यामुळे जनतेतूनही चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. मगो पक्ष आपल्याविरोधात विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे व त्यामुळे आपण मगोपला फोडले असे सांगितले जात असले तरी, पेडणे व सावर्डे मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची त्यामुळे गोची झाली आहे. कोअर टीमच्या सोमवारच्या बैठकीत राजेंद्र आर्लेकर यांनी हा विषय उपस्थित केला. बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर या मगोप आमदारांना भाजपामध्ये प्रवेश देताना आम्हाला साधी कल्पनाही दिली गेली नाही, आम्ही कोअर टीमचे सदस्य आहोत, असे आर्लेकर बैठकीत म्हणाले. भाजपाने आणखी आमदार फोडण्याचे राजकारण करू नये, असे अन्य दोन सदस्यही बैठकीत बोलले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना हा सल्ला पटला की नाही ते कळू शकले नाही पण पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वानेच मगोपचे दोन आमदार भाजपामध्ये आणण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण तेंडुलकर यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना काँग्रेसमधून भाजपामध्ये घेण्याच्या निर्णयामुळे तीन महिने पार्सेकर यांनी गोव्यातील स्थानिक भाजपा नेतृत्वाविरुद्ध कडक टीकेची झोड उठवली होती. सोमवारच्या बैठकीत तेही सहभागी झाले. फोडाफोडीविरुद्ध त्यांच्याही मनात असंतोष आहे.