भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा कोण? उत्तर गोव्यातील मतदारांना प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2024 10:45 AM2024-03-08T10:45:52+5:302024-03-08T10:46:53+5:30
उत्तर गोव्यात ७ मतदारसंघांचा समावेश असलेला बार्देश तालुका केंद्रस्थानी
प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : उत्तर गोव्याच्या लोकसभा मतदारसंघावर विजयी झेंडा फडकावण्यासाठी ७ मतदारसंघाचा समावेश असलेला बार्देश तालुका केंद्रस्थानी आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातून कोणता उमेदवार विजयी होईल, याची दिशा ठरवण्याची क्षमता या तालुक्याकडे आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदार यावेळी कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपकडून सहाव्यांदा खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देण्याचे ठरवण्यात आले आहे, असे असले तरी विरोधकांकडून अद्यापही उमेदवारीवर निर्णय घेतलेला नाही. विरोधकांकडून उमेदवार ठरला जात नसल्याने काँग्रेस पक्षाचे मतदार संभ्रमात आहेत. सतत पाच वेळा निवडून आलेले श्रीपाद रिंगणात असले तरी यावेळी मतदार थोडा वेगळा विचार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीपाद नाईक यांचे प्रत्येकाशी तसे चांगले संबंध आहेत पण वारंवार त्यांना निवडून देण्याबाबत हा युवा मतदार विचार करु शकतो.
आरंभी काँग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप तसेच पक्षाचे सरचिटणीस विजय भिके यांची नावे समोर आली होती. पण, कालांतराने खलप यांचे नाव मागे पडल्याने सुनिल कवठणकर यांचे नाव काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे. खलप आणि कवठणकर या दोघांतील कोण प्रभावी आहे, हे शेवटी पक्ष ठरवणार आहे. उमेदवारी संबंधीचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
दुसऱ्या बाजूने आरजीच्या वतीने मनोज परब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परब हे स्वतः बार्देश तालुक्यातील असल्याने त्यांनी आपला प्रचारही सुरु केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी आरजीने तालुक्यातून आपली ताकद दाखवून दिली होती. काही उमेदवारांच्या पराभवालाही ते कारण ठरले होते. गोवा फॉरवर्ड तसेच आम आदमी पार्टी या पक्षांची म्हणावी तशी ताकद तालुक्यातून दिसून आलेली नाही. तसेच पक्षाचे कार्यही होत नसल्याचे आढळून आले आहे.
एका बाजूने उत्तरेतून भाजपच्या आमदारांचे वर्चस्व दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूने उत्तर तसेच बार्देश तालुक्यातून काँग्रेसचे एकमेव आमदार फेरेरा कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील तीन आमदारांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यातील काँग्रेसची ताकद बरीच घटली आहे. तालुक्यातील काँग्रेसचे आमदार फेरेरा यांची मर्यादा फक्त हळदोणा मतदारसंघापुरती मर्यादित असल्याने पक्षाच्या एकूण बाबींवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
इंडिया आघाडीजवळ फेरेरा एकमेव उमेदवार
बार्देश तालुक्यातील बहुतांश विरोधी आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद बरीच कमी झाली आहे. जे उमेदवार इच्छुक यादीत आहेत त्यातील खलप यांच्याजवळ तेवढी क्षमता नसल्याने ते भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना टक्कर देऊ शकत नाहीत. त्यामुळे श्रीपाद नाईक यांना प्रभावीपणे टक्कर देण्यासाठी आमदार फेरेरा हे एकमेव उमेदवार इंडिया आघाडीजवळ आहेत. फेरेरा यांना उमेदवारी दिल्यास ते श्रीपाद नाईक यांना टक्कर देऊ शकतात. - प्रेमानंद प्रभू, राजकीय समीक्षक, हळदोणा
श्रीपाद नाईक यांना टक्कर देणे शक्य आहे?
भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना टक्कर देण्यासाठी तालुक्यातून काँग्रेसकडे अद्यापही सक्षम असा उमेदवार नाही. अंतिम क्षणी आयात उमेदवाराला उमेदवारी देणे असे प्रकार काँग्रेसकडून सतत घडवले जातात. त्यामुळे गंभीरपणे अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना बाजूला सारले जाते. जे उमेदवार आहेत ते प्रभावहीन झालेले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळत नाही, ते काँग्रेसकडे उमेदवारीसाठी येतात. त्यामुळे श्रीपाद नाईक यांना टक्कर देणारा अद्यापही उमेदवार काँग्रेसकडे नाही. - गंगाधर भोसले, समीक्षक