Goa Lok Sabha Election 2024: तिकिटासाठी तारीख पे तारीख; दक्षिणसाठी भाजपचे ठरेना, काँग्रेसच्या दोन्ही जागा गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 08:46 AM2024-03-23T08:46:37+5:302024-03-23T08:47:09+5:30
Goa Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार कोण याचा निर्णय अजून भाजप लावू शकला नाही. भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा मतदारसंघाचा उल्लेख झालेला नाही.
Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असताना दक्षिण गोव्याच्या उमेदवारीवरून भाजपसह काँग्रेसमध्येही 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू आहे. काँग्रेसने तर उत्तर गोव्याचा उमेदवारही जाहीर केलेला नाही, तर भाजपने उत्तरेतून श्रीपाद नाईक यांना तिकीट दिले आहे. चौथ्या यादीत भाजप दक्षिणचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता होती. काल ही यादी जाहीर झाली. मात्र, उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे.
दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार कोण याचा निर्णय अजून भाजप लावू शकला नाही. भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा मतदारसंघाचा उल्लेख झालेला नाही. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघात कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा असेल, अशी अपेक्षा होती. मात्र या यादीतही दक्षिणेचा उल्लेख झालेला नाहीत. त्यामुळे दक्षिणेत कोण हा प्रश्न अजून सुटलेला नाही हेच संकेत मिळत आहेत.
दक्षिण गोव्याची उमेदवारी बाबू कवळेकर किंवा नरेंद्र सावईकर यांनाच उमेदवारी मिळणार, अशी सुरुवातीला चर्चा होती. नंतर त्यात दिगंबर कामत, रमेश तवडकर व दामू नाईक यांची नावे पुढे आली. कामत व तवडकर यांनी नकार दिला. त्यानंतरच्या घडामोडीत भाजप श्रेष्ठींनी दक्षिणेत महिला उमेदवार देण्याचा आदेश दिला. त्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली. अनेक महिलांची नावे उमेदवार म्हणून पुढे आली. मात्र, चर्चेच्या अंतिम टप्प्यात पल्लवी धेंपेचे व नाव पुढे आले असून, त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.