पणजी : ड्रग्जप्रकरणी आम्ही जे आरोप करत होतो, ते रवी नाईकच्या मुलावर नव्हे अशा प्रकारचा मोठा यू-टर्न भाजप प्रदेशाध्यक्षांनी गुरुवारी घेतल्यानंतर राज्यभर त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावरून याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. भाजपला तूर्त मोठय़ा टीकेस सामोरे जावे लागत आहे.रवी नाईक गृहमंत्री असताना स्व. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते होते व त्यावेळी त्यांनी कोणती विधाने केली होती व रवींचा राजीनामा कसा मागितला होता, याविषयीचे व्हीडीओ सामाजिक कार्यकर्ते सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. भाजपाचे दामू नाईक व अन्य पदाधिकारी तेव्हा ड्रग्ज प्रकरणी रवी नाईक व रॉयवर तुटून पडत होते, तसेच राज्यपालांकडेही निवेदन सादर करून भाजपने त्यावेळी ड्रग्ज प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रॉय हा त्यावेळी भाजपच्या हिटलिस्टवर होता. पर्रीकर मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर रवी नाईकना समोर ठेवून पर्रीकरांनी मुद्दाम मिकी पाशेकोंच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती नेमली होती. मिकी पाशेको हे रवी व त्यांच्या मुलाला लक्ष्य बनवत होते व त्यामुळे मिकीकडेच ड्रग्ज प्रकरणी चौकशी काम सोपविले गेले होते. नंतर मिकीने अहवालही दिला होता.दरम्यान, आम्ही ड्रग्ज प्रकरणी जे आरोप करत होते, तो रॉय हा नव्हे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी जाहीर करून गोमंतकीयांना मोठा धक्का दिला आहे. रॉय रवी नाईक यांचे भाजपामध्ये स्वागत झाल्यानंतर भाजपमधील एक गटही गोंधळला आहे. पक्ष कोणत्या मार्गावरून चालला आहे असा प्रश्न भाजपच्या कोअर टीमच्याही काही सदस्यांना पडला आहे. भाजपचे काही माजी मंत्री तर अगोदरच नाराज आहेत. फक्त रितेश नाईक यांना पक्षात घेतले असते तर कुणाचा आक्षेप नव्हता, पण रॉयलाही का घेतले गेले, असा प्रश्न भाजपच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिका-यांना व काही आमदारांनाही पडला आहे.आम्ही ड्रग्ज प्रकरणी रॉयला टार्गेट केलेच नव्हते असे सांगणो हे अधिक धक्कादायक असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. र्पीकर यांनी माविन गुदिन्हो यांनाही प्रचंड आरोपांद्वारे बदनाम करून मग शेवटी त्यांनाच भाजपमध्ये घेतले होते. त्यावेळीही पत्रकार परिषदेत र्पीकर यांनी माविनचे स्वागत करताना त्यास वीज घोटाळा प्रकरणी क्लिन चिटही दिली होती, त्याची आठवण आता रॉय प्रकरणी अनेकांना होत आहे.
रॉयविषयीच्या यू-टर्नमुळे भाजप टीकेस पात्र, सोशल मीडियावर तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 7:16 PM