लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी गोव्यात १ लाख भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर भाजपचे झेंडे फडकविले जातील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
केवळ ६ रोजी घरांवर भाजपचे झेंडे फडकवून हा कार्यक्रम संपणार नाही, तर यानिमित्त आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तानावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते दामू नाईक, सरचिटणीस वरद मांद्रेकर आणि गोरख मांद्रेकर उपस्थित होते.
६ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम झाल्यानंतर राज्यात सार्वजनिक हॉलपेंटिंग किंवा कार्यकर्त्याच्या घराचे पेंटिंग किंवा कुंपणाचे वैगेरे कार्यकर्त्यांकडून पेंटिंग केले जाईल, असे त्यांनी सागितले. ७ एप्रिल रोजी भाजप युवा मोर्चातर्फे विविध कार्यक्रम केले जातील. या दिवशी राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे.
८ एप्रिल रोजी एससी, एसटी आणि अल्पसंख्याक मोर्चातर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जातील. ९ रोजी किसान मोर्चातर्फे कार्यक्रम केला जाईल. शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल, असे तानावडे यांनी सांगितले. ऑर्गेनिक फार्मिंगची महितीही दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. १० रोजी महिला मोर्चा कार्यक्रमाची सूत्रे सांभाळतील. सरकारच्या विविध योजनांची माहिती महिलांना या कार्यक्रमातून दिली जाईल.
११ रोजी ज्योतिबा फुले यांची जयंती असून, ओबीसी मोर्चातर्फे विविध उपक्रम केले जातील. १२ रोजी रक्तदान शिबिरे आणि इतर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १३ रोजी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. ६ ते १४ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विशेष कार्यक्रम केला जाईल. ६ ते १४ तारखेपर्यंतचा आठवडा हा विशेष पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधानांचे संबोधन
पक्षाचा स्थापना दिन हा राष्ट्रीय स्तरावर केला जाणार असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भाषणे मोठ्या स्क्रीनवर एकत्रितपणे पाहण्याचे आयोजनही वेगवगळ्या ठिकाणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी भाजपचा मोठा झेंडा लावला जाईल, असेही तानावडे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"