पणजी : भाजपाने लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जागृती करावी या हेतूने मेरा परिवार, भाजपा परिवार, असा कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भाजपाचे आमदार, माजी आमदार, कार्यकर्ते यांच्या घरांवर भाजपचे झेंडे लावले जात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिल चेअरवर बसून आपल्या निवासस्थानी हाती भाजपचा झेंडा घेतला व हा कार्यक्रम राबवला. त्यांच्या बाजूला मुलगा उत्पल व त्याची बायको (मुख्यमंत्र्यांची सून) असा फोटोही काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
पर्रीकर यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचे असे छायाचित्र कधी जारी केले नव्हते. आता प्रथमच मेरा परिवार, भाजपा परिवार, असा कार्यक्रम आपणही केल्याचे दाखवून देणारे छायाचित्र पर्रीकर यांनी जारी केले आहे. करंजाळे- दोनापावल येथील पर्रीकर यांच्या निवासस्थानी हा छोटा कार्यक्रम केला गेला. पर्रीकर यांच्या या ताज्या छायाचित्रामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश जाईल, असे मानले जात आहे. भाजपा परिवाराचा आपण भाग आहोत याचा अभिमान वाटतो, असेही पर्रीकर यांनी म्हटले आहे.
राज्यभर भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर मंगळवारी भाजपचे झेंडे लावण्यात आले. पणजीत सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनीही आपल्या घराला भाजपचा झेंडा लावला व स्वत: आणि पत्नी असा एकत्र फोटो भाजपच्या झेंडय़ासह शेअर केला. वाळपईत मंत्री विश्वजित राणे यांनी असा उपक्रम भाजपच्या कार्यालयात राबविला. दरम्यान, दिल्लीच्या एम्स इस्पितळातून पर्रीकर यांना गेल्या आठवडय़ात डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते अजून पुन्हा पर्वरी येथील मंत्रलयात आलेले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बांबोळीला घेतलेल्या सभेवेळी ते पाच मिनिटांसाठी येऊन गेले होते.