लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी धंपे यांना मत दिल्यास तुमचे मत निःशंकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार आहे. परंतु, बँकेला कुलुप ठोकणारे आणि गोव्याचे नाव बदनाम करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना मत दिल्यास ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांपैकी कोणालाही जाऊ शकते. काँग्रेस आज केवळ नकारात्मक प्रचार करत आहे. काँग्रेसजवळ समस्यांची उत्तरे नाहीत. उलट भाजपाकडे १० वर्षांचा जाहीरनामा आणि पुढील २५ वर्षांचा दुष्टीकोन आहे, असे भाजपाचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी शनिवारी सांगितले.
भाजपाच्या पणजी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायात सदस्य गिरीश उस्कईकर उपस्थित होते. वेर्णेकर म्हणाले की, धर्मनिरक्षेतेचा धिंडोरा पिटणाऱ्या काँग्रेसकडून पर्सनल लॉची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले जात आहे. समान नागरी कायद्याला त्यांचा विरोध आहे. परंतु, गोव्यात हा कायदा अस्तित्वात आहे आणि येथील सामाजिक सलोखा अबाधित आहे. यामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिका अधोरेखित होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
जीएसटीखाली एकच कर लागू करणार असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. याचा अर्थ लक्झरी आणि शेती मालासाठी एकच दर लागू होणार आहे का, असा सवाल वेर्णेकर यांनी केला. एक राष्ट्र, एक निवडणूक होऊ देणार नसल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसला सतत आरसंहिता पाहिजे आणि देश दुय्यम अशीच त्यांची भूमिका आहे, असा आरोप वेर्णेकर यांनी केला. दक्षिण गोव्यात भाजपाच्या उमेदवाराला नाकारत असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे उमेदवार कें. विरिएतो फर्नांडिस यांनी नुकतेच केले होते. भाजपाची चिंता करणारे कें. फर्नाडिस यांना तिकिट जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे मुख्य नेते कुठे आणि का गायब झाले आहेत याचा शोध त्यांनी घ्यावा, अशा टोला वेर्णेकर यांनी हाणला.