लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : "भारतात आतापर्यंत आलेल्या सरकारांनी लोकांना फक्त आश्वासने देण्याचे काम केले. जाहीरनाम्यात दिलेली वचने त्यांना पाळता आली नाहीत. मात्र, भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले,' असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. विकसित भारत संकल्प यात्रा बुधवारी फोंडा शहरात पोहोचली. त्यावेळी नगरपालिका आवारात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'सरकारने जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही, हे पाहण्यासाठी आमचे सरकार धडपडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासंदर्भात जी गॅरंटी दिली होती, ती गॅरंटी खरंच लोकांपर्यंत पोहोचली की नाही याची गॅरंटी करून घेण्यासाठीच विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषिमंत्री रवी नाईक, जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, सरपंच संजना नाईक, भाजप मंडळ अध्यक्ष व नगरसेवक विश्वनाथ दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सर्वांना विकसित भारत संदर्भात शपथ दिली. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. शैलेश बोरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.