सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली सरकारने कंपन्यांशी फक्त दलालगिरी केली आहे, असा आरोप वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी वाळपईतील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. राणे म्हणाले की, सरकारने कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली कंपन्यांशी व्यवहार केला; पण प्रत्यक्षात कंपन्या सुरूच झाल्या नाहीत. ज्या काही मोजक्याच सुरू झाल्या त्यात गोव्यातील युवकांना रोजगार दिला नाही. गोव्याबाहेरील लोकांना रोजगार दिला. त्यामुळे सरकारने फक्त दलालगिरी केली. सरकारने आपली चूक मान्य करून कंपन्या सुरू करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली. रोजगारपूर्व प्रशिक्षण नावाखाली गोव्यातील युवकांची घोर फसवणूक केली. त्या युवकांना मागील काँग्रेस सरकारने नोकरीत सामावून घेतले. जे भाजप सरकार ऊर्जा योजनेखाली बल्बचे वितरण करीत आहे तो पैसा भाजपाचा नसून सरकारचा आहे; पण सरकारने त्यात राजकारण केले असून त्या वितरणावेळी समारंभाचे व्यासपीठ हे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व्यासपीठ बनले आहे. बल्ब वितरणाच्या नावाखाली भाजप आपला प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. सरकारला जनतेचा जर पुळका होता तर वाढीव वीज दर कमी केले असते. ग्रामीण भागात विजेचा दरदिवशी लपंडाव सुरू असतो. तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असते. तीन महिन्यांनी वीज बिले देऊन गरीब जनतेवर अन्याय केला आहे. जो वीज बिलात घोळ सुरू आहे तो घोळ न सोडविता बल्ब वितरण करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार झाला आहे, असे राणे म्हणाले. जनतेचे बुरे दिन सुरू आहेत; कारण वीज व पाणी बिले भरमसाट झाली आहेत. युवकांची फसवणूक सुरू आहे. अशावेळी जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकार करीत आहे. अशावेळी अच्छे दिन कसे असतील, असा सवाल त्यांनी सरकारला केला. योग्यवेळी महाआघाडी येणारे सरकार काँग्रेसचे असणार असून योग्यवेळी महाआघाडी केली जाईल. विधानसभेत भाजप सरकारला उघडे पाडण्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
भाजप सरकार दलालगिरीचे
By admin | Published: July 26, 2016 2:38 AM