पणजी : भाजपला आगामी काळात केंद्रामध्ये वा अन्यत्र सत्ता मिळो अथवा न मिळो, पण हा पक्ष पुढील अनेक दशके देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असे परखड मत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकांत तृणमूल काँग्रेसही मैदानात उतरणार आहे. त्या पक्षाला निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी प्रशांत किशोर मदत करत आहेत. ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या चाळीस वर्षांत काँग्रेस राजकारणाच्या केंद्रस्थानी होती. नेमके तेच स्थान आता भाजपला मिळाले आहे.
ज्या पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर ३० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतात, तो पक्ष सहजासहजी पिछाडीला जात नाही. देशातील जनता अत्यंत संतप्त झाली असून ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून दूर सारेल या भ्रमात कोणीही राहू नये.