सदगुरू पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीने राज्यभर फिरून भाजपचा एकहाती प्रचार करायचे व कार्यकत्यांमध्येही चैतन्य निर्माण करायचे, त्याच पद्धतीने यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनीही गोवाभर फिरून भाजपचे दमदार प्रचार काम केले. त्यांना अत्यंत समर्पक अशी साथ प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडून मिळाली.
भाजपमधील एकत्रित प्रयत्नांमुळेच गोव्यात यावेळी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे. हिंदूबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे बळ मोठे आहेच. तथापि, तिथे मुख्यमंत्री सावंत व तानावडे यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांनी विशेष लक्ष दिले आणि कष्ट घेतले यामुळे मतांचे प्रमाण खूपच वाढले आहे.
मुख्यमंत्री सावंत व तानावडे यांनी पूर्ण चाळीसही मतदारसंघ फिरून काढले. पक्षाकडे आता पर्रीकरांचे नेतृत्व नाही व पूर्णवेळ संघटनमंत्री देखील नाहीत; पण पक्षाने अत्यंत प्रभावी प्रचार हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केला. केवळ हिंदूच नव्हे तर खिस्ती व मुस्लीम नीम मतदारांशी स्वतंत्र संवाद साधला गेला. एवढेच नव्हे तर बैलांच्या रेड्यांच्या झुंजी जे लोक लावतात त्यांच्याशी देखील स्वतंत्र बैठक घेऊन संवाद साधला गेला. एकही घटक भाजपने संपर्काशिवाय सोडला नाही. भाजपच्या प्रत्येक मंत्री व आमदाराने ही स्वतःचीच विधानसभा निवडणूक आहे व स्वतःच उमेदवार आहेत, असे मानून काम केले. मगोच्याही दोन्ही आमदारांनी तसेच काम केले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांनी संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराचे सगळे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करून घेतली.
सासष्टीची भीती वाटत नाही
पूर्वी - दक्षिण गोव्यातील निवडणूक म्हटले की, भाजपला सासष्टी तालुक्याची भीती वाटायची. कारण त्याच तालुक्यात काँग्रेसला पन्नास हजारांची आघाडी मिळत होती. मात्र, यावेळी मडगाव, नुवे, कुडतरी अशा मतदारसंघांमध्ये भाजपने काँग्रेसचे बळ अगोदर कमी केले. सासष्टीत आता कितीही आघाडी काँग्रेसने घेतली, तरी सांगे-सावर्डे- फोंडा व मुरगावमध्येही भाजपने आपले बळ वाढविल्याने आता सासष्टीबाबत भिण्याचे कारणच भाजपला राहिलेले नाही.
पक्षाकडे १८ हजार कार्यकर्ते
उत्तर गोव्यात ११ हजार आणि दक्षिण गोव्यात ७ हजार मिळून एकूण १८ हजार सक्रिय कार्यकर्ते भाजपकडे आहेत. एवढ्या कार्यकर्त्यांची नावांसह यादी सदानंद तानावडे यांच्याकडे आहे. या कार्यकर्त्यांची म्हणजे पन्ना प्रमुखांची संमेलने पक्षाने निवडणुकीपूर्वी घेतली. मतदार यादीच्या प्रत्येक पानावर जेवढ्या मतदारांची नावे असतात, तेवढ्या मतदारांचा तो कार्यकर्ता प्रमुख केला जातो. त्या कार्यकत्यनि त्या पानावर नावे असलेला प्रत्येक मतदार मतदानासाठी येईल याची काळजी घ्यायची असते. खुद्द मुख्यमंत्री सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष तानावडे हेही आपल्या भागातील एका परिसराचे पन्ना प्रमुख होते. त्यांनीही आपल्या त्या परिसरातील सर्व लोक मतदानासाठी येतील याची काळजी घेतली.