पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर घेऊन मोठे यश प्राप्त केल्यानंतर आता पालिका निवडणुका देखील पक्ष पातळीवर घेण्याविषयी भाजपमध्ये खल सुरू झाला आहे. भाजपच्या सर्व स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र आमदारांमध्ये याविषयी तीव्र मतभेद असून त्या मतभेदांचे दर्शन घडू लागले आहे.
ज्या पालिका क्षेत्रांमध्ये ख्रिस्ती व मुस्लिम धर्मिय मतदार जास्त आहेत, तिथे आम्हाला पक्षाच्या चिन्हावर निवडणूक नको असे भाजपच्या काही आमदारांचे व मंत्र्यांचेही म्हणणे आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक घेणे हे धोक्याचे ठरेल असा इशारा यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी दिला तरी, भाजपधील चर्चा थांबलेली नाही. भाजपकडून विविध पदाधिकारी, तसेच प्रमुख कार्यकर्ते व आमदारांचेही मन जाणून घेतले जात आहे. भाजपला पक्षाच्या चिन्हावर पालिका निवडणूक झालेली हवी आहे. त्यासाठी प्रसंगी सरकार कायदा दुरुस्ती करील. पालिका कायद्यात दुरुस्ती केल्यानंतरच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक घेता येते.
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना पालिका निवडणुका पक्षाच्या निशाणीवर झालेल्या हव्या आहेत. पणजी महापालिकेची निवडणूकही अन्य पालिकांच्या निवडणुकीसोबत होणार आहे. फेब्रुवारीपर्यंत निवडणूक होईल. मोन्सेरात यांना पणजीत पक्षाच्या चिन्हावर महापालिका निवडणूक का हवी आहे असा प्रश्न अन्य काही नगरसेवकांनाही पडला आहे. पणजीत मोन्सेरात कोणता प्रयोग करून पाहतात असा प्रश्न नगरसेवकांना व पणजीबाहेरील काही आमदारांनाही पडला आहे. पणजीतील ख्रिस्ती मतदारांमध्ये व शिक्षित मतदारांमध्ये अजून मोन्सेरात यांना मोठेसे स्थान नाही. भाजपच्या चिन्हावर पणजीत ख्रिस्ती मतदारांची मते फक्त स्व. मनोहर पर्रीकर यांना मिळत होती. काही प्रमाणात एकदा ती मते सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनाही मिळाली. मात्र मोन्सेरात यांना पक्षाच्या चिन्हावर ती मते मिळविणे जड जाईल याची कल्पना काही नगरसेवकांना आहे. तरी देखील मोन्सेरात यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक घेऊया अशी भूमिका घेतल्याने त्याविषयी नगरेसवक चर्चा करत आहेत. भाजपचा निर्णय पुढील पंधरवड्यात होईल, असे कोअर टीमच्या दोघा सदस्यांनी सांगितले. काही मंत्री मात्र आपल्या क्षेत्रात पालिका निवडणुका पक्षाच्या निशाणीवर नको यावर ठाम आहेत. मडगाव, वाळपई, केपे, डिचोली, म्हापशातही पक्षाच्या निशाणीवर पालिका निवडणूक भाजपला जड जाऊ शकते.