किशोर कुबल/ पणजी
पणजी : गोव्यात साखळी व फोंडा या दोन्ही पालिकांवर भाजपने झेंडा फडकावला आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळीत तर कृषीमंत्री रवी नाईक यांची फोंड्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुका पक्ष विरहित असल्या तरी भाजपसह सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली होती.
फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले. साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या. खुद्द ‘ टुगेदर फॉर साखळी’ या विरोधी पॅनलचे नेते धर्मेश सगलानी यांचा ३० मतांनी पराभव झाला. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत सगलानी हे मुख्यमंत्री सावंत यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी ठरले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ ६६६ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.दुपारी राज्य निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले. साखळी पालिकेत ८७.५६ टक्के विक्रमी मतदान झाले होते. तर फोंडा पालिकेत ७४.६६ टक्के मतदान झाले होते.साखळीतील प्रभाग ८ मध्ये रियाझ खान व प्रभाग ५ मध्ये प्रवीण ब्लॅगन तर फोंड्यात प्रभाग ७ मध्ये भाजपचे विश्वनाथ दळवी व प्रभाग १३ मध्ये विद्या पुनाळेकर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत................. लोकांनी विश्वास दाखवला ; लोकसभेतही दोन्ही जागा भाजपच जिंकणार : तानावडेभाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या विजयावर प्रतिक्रिया देताना लोकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवल्याचे म्हटले आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकारचे जे काम चालले आहे त्याची लोकांनी पावती दिली. साखळीत १२ पैकी ११ जागा भाजपला मिळाल्या हे मोठे यश आहे. फोंड्यातही मंत्री रवी नाईक यांच्यावर लोकांनी विश्वास दाखवला. येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपच जिंकणार याचे हे संकेत आहेत, असे ते म्हणाले.