लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राजकीय आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर केले जाईल, असे म्हणत भाजपने पेढे वाटले. पेढे वाटून भाजपने चालवलेली एसटी समाजाची थट्टा बंद करावी, असा इशारा पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी समाजाच्या नेत्यांनी दिला.
दरम्यान, राजकीय आरक्षणाची मागणी करणाऱ्या एसटी नेत्यांची शनिवारी काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पणजी येथील आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते. यावेळी त्यांनी नेत्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
एसटी समाजाचे नेते रामा काणकोणकर म्हणाले की, राजकीय आरक्षणाचे विधेयक मंजूर करू, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर भाजपने गोव्यात पेढे वाटले. विधेयक आम्हाला मान्य नाही. कारण, ते कधी मंजूर होऊन त्याच्या कायद्यात रूपांतर होईल हे ठाऊक नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राजकीय आरक्षणाची अधिसूचना सरकारने जारी करावी. भाजप सरकारने एसटी समाजाची थट्टा थांबवावी. एसटी समाजाच्या आमदारांनी कुणासाठी हे पेढे भरवले हे सांगावे. हे सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
एसटी नेते रूपेश वेळीप म्हणाले की, राजकीय आरक्षणाचे विधेयक मंजूर होण्यासाठी संसदेचे अधिवेशन व्हायला हवे. सदर प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.