लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव :गोवा मुक्त होण्यास झालेल्या विलंबाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला. त्यासाठी देशभरातील तसेच गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांनीही योगदान दिले. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटनेचा जो अपमान केला, त्यावर गोव्याचे लोक गप्प बसणार नाहीत, असे ते म्हणाले.
मडगाव व फातोर्डात शनिवारी (दि.४) भाजपने पदयात्रा आयोजित केली होती. येथील लोहिया मैदानावर डॉ. राममनोहर लोहिया यांना वंदन करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. विकास व संघटनेच्या पाठबळावर भाजप निवडणूक लढवीत असून, गोव्यातील दोन्ही जागा आम्हीच जिंकू असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. ही निवडणूक रेकॉर्ड ब्रेकिंग असेल. दक्षिणेची जागा आम्ही ६० हजारांहून जास्त तर उत्तरेत आम्ही १ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकणार, असेही सांगितले.
आतापर्यंत गोव्यात ६७ टक्के मतदान होत असे, यावेळी ते ७० टक्क्यांहून जास्त होईल. काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटनेवर टीका केली. त्याची फळे या पक्षाला गोव्यातच नव्हे, तर देशात भोगावी लागणार आहे. काँग्रेसचा एकही नेता, राहुल गांधी, प्रियांका गांधी वा मल्लिकार्जुन खरगे हे गोव्यात फिरकलेच नाही. गोव्याला त्यांनी गंभीरतेने घेतलेच नाही. उमेदवार पडणार हे त्यांनाही समजून चुकले आहे. युरी आलेमाव यांनी हे समजून घ्यावे. डबल इंजिन सरकार पुन्हा आणायचे आहे. मोदी यांच्यासाठी मतदान केले पाहिजे. आम्ही केंद्र सरकारच्या सहाकार्याने राज्यात विकास घडवून आणला आहे. सासष्टीत आमच्याकडे आता दिगंबर कामत यांच्यासारखा नेता आहे, असेही त्यांनी सांगितले. पदयात्रेत आमदार कामत, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, माजी आमदार बाबू आजगावकर, नगराध्यक्ष दामू शिरोडकर व अन्य भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.