सदगुरू पाटील
पणजी : मी वीस वर्षे भाजपासोबत राहिलो. वीस वर्षे मी भाजपाशी निष्ठा ठेवली. माझ्या निष्ठेची हिच का भाजपाने कदर केली असा संतप्त प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ आमदार व मावळते मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी विचारला आहे.
डिसोझा हे अमेरिकेतील स्लोन केट्टरींग रुग्णालयात गंभीर आजारावर उपचार घेत आहेत. ज्या ज्यावेळी गोव्यात भाजपाचे सरकार आले, त्या त्या वेळी डिसोझा यांना भाजपाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. डिसोझा हे सलग पाचवेळा म्हापसा मतदारसंघातून निवडून आले. डिसोझा यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी डिसोझा यांना सोमवारी सकाळी कळवले. त्यानंतर अमेरिकेहून फोनवर डिसोझा यांनी लोकमतला मुलाखत दिली.
तुम्हाला मंत्रिमंडळातून वगळल्याविषयी काय वाटते असे विचारले असता डिसोझा म्हणाले की, मला जर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितले असता तर मी दिला नसता. मला मंत्रिमंडळातून डच्चू देण्यापूर्वी विश्वासात घेतले गेले नाही. मी वीस वर्षे भाजपासोबत निष्ठा ठेवली. त्या निष्ठेचा पुरस्कार मला भाजपाने दिला असेच समजतो.
मंत्री डिसोझा म्हणाले, की मी फक्त एक महिनाच मंत्री म्हणून माझ्या कामापासून दूर राहिलो. अन्यथा मी नेहमीच माझं काम करत आलो आहे. मी गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत असून गेल्या 18 तारीखेपर्यंत मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अमेरिकेत माझ्यावर उपचार करण्याची सगळी व्यवस्था पर्रीकर यांनीच केली होती. मी वीस वर्षे भाजपासोबत राहिल्याने भाजपा केवळ एक महिन्याची माझी अनुपस्थिती सहन करू शकत नाही का असा मला प्रश्न पडतो. मग निष्ठेला किंमत ती काय राहिली असाही प्रश्न येतो.
डिसोझा म्हणाले की, मंत्री म्हणून काम करण्याची माझी अजूनही क्षमता आहे. फक्त मी सध्या गोव्यापासून दूर अमेरिकेला आहे. येत्या काही दिवसातच माझ्यावरील उपचार पूर्ण होतील. पक्षश्रेष्ठींनी मला मंत्रिमंडळातून वगळावे असे ठरवले असे पर्रीकर यांनी मला सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले.