पणजी : माजी वन मंत्री श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला व सायंकाळी दिल्लीला जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आपमध्ये स्वागत केले. आपमध्ये प्रवेश केलेल्या त्या गोव्यातील पहिल्या भाजप आमदार ठरल्या. गोव्यात आपचे काम जोरात सुरू आहे. भाजप हा आता तत्त्वांचा पक्ष राहीलेलाच नाही, तो दिशाहीन झालाय अशी टीका साल्ढाणा यांनी केली.
दरम्यान, श्रीमती साल्ढाणा यांनी राजीनामा देण्यापूर्वीच सकाळी आम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, असा दावा रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. साल्ढाणा यांच्याविरुद्ध सभापतींकडे अपात्रता याचिका सादर केली जाईल असे ते म्हणाले.
तानावडे म्हणाले की, एलिना साल्ढाणा यांना २०१२ साली त्यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी म्हणून भाजपने उमेदवारी दिली आणि बिनविरोध निवडून आणले होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या फक्त भाजपाच्या उमेदवार म्हणून तेव्हा निवडून आल्या. त्यानंतर भाजपच्या सरकारमध्ये त्या मंत्री झाल्या होत्या.
२०१७ साली स्थानिकांचा विरोध असतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि भाजपाने निवडून आनले. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी सातत्याने भाजपाच्या विरोधात व सरकारच्या विरोधात आपली भूमिका घेणे सुरू केले होते . आणि त्यामुळेच आज सकाळीच भाजपाने एलिना साल्ढाणा यांना पक्षातून काढून टाकले होते . असा खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज केला आहे. रात्री पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की एलिना यांना पक्षातून काढल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
पक्षाचा राजीनामा न देता आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला . त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे .मात्र तो राजीनामा सभापती स्वीकारलेला नसतानाच त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांना आठवण झाल्यानंतर रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे . अशी माहिती देउन या सर्व कायदेशीर बाबी आहेत. आणि त्याबाबत पक्ष कायदेशीर सल्ला घेत असल्याचे तानावडे यांनी सांगितले.
पक्षाचा राजीनामा न देता आमदारकीचा राजीनामा स्वीकारलेला नसतानाही दुसऱ्या पक्षात सामील होणे हा कायदे भंग ठरतो की नाही हे आपणास माहित नाही. मात्र त्यावर कायदेशीर सल्लामसलत सुरू असल्याचे एका प्रश्नावर बोलताना तानावडे यांनी सांगितले. कुठ्ठाळीमध्ये भाजप पक्षाचा विस्तार चांगल्या रीतीने झालेला आहे आणि त्यामुळे तेथे भाजपाचा उमेदवार पुन्हा एकदा निवडून येईल असेही पुढे यावेळी तानावडे म्हणाले .