पणजी : भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युती झालेली असली, तरी काही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये भाजप आणि मगो पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांविरुद्ध प्रचार करत असल्याचे आढळून येत आहे. भाजप आणि मगोच्या नेत्यांपर्यंतही याबाबतच्या तक्रारी पोहोचल्या आहेत. तिसवाडी, फोंडा, पेडणे, मुरगाव अशा तालुक्यांमध्ये काही मगो आणि भाजप उमेदवारांना फंदफितुरीचा अनुभव सध्या येत आहे. मगो पक्षाला भाजपने जिल्हा पंचायतीच्या एकूण नऊ जागा दिल्या आहेत. उत्तरेत मगोला दोनच जागा देण्यात आल्या आहेत. सांताक्रुझमधील दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ भाजपकडून मगोला देण्यात आले आहेत; पण भाजपचा एक प्रमुख पदाधिकारी तिथे मगोच्या उमेदवारांविरुद्ध काम करतो. तो बाबूश मोन्सेरात यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहे. उर्वरित भाजप कार्यकर्ते मात्र मगोच्या उमेदवारासाठी काम करत आहेत. पेडणे तालुक्यात काही मगो कार्यकर्ते भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत. फोंडा तालुक्यातही भाजपचे काही प्रमुख कार्यकर्ते मगोच्या उमेदवारांना सहकार्य करत नाहीत, असे मगोच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. भाजप-मगो युती कागदोपत्री असली, तरी प्रत्यक्षात काही मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी, तर काही ठिकाणी मगो कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. भाजपप्रमाणेच मगो पक्षातही बंडखोरी झाली आहे. जिल्हा पंचायतीच्या जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. बार्देस, पेडणे, फोंडा, मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांमध्ये अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. अर्थात मतदानाचा दिवस येईपर्यंत ही स्थिती बदलू शकते. (खास प्रतिनिधी)
भाजप-मगो प्रचारयुद्ध
By admin | Published: March 15, 2015 2:54 AM