पणजी : उद्या, शनिवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय परिस्थितीनुसार भाजप निर्णय घेणार आहे. मगोपची भूमिका मात्र सरकार स्थापनेसाठी शक्यतो काँग्रेस पक्षापासून दूर राहावे अशी आहे. भाजप जर मगोपच्या अटी मान्य करत असेल, तर प्रसंगी भाजपसोबतही फेरयुती करण्याची मगोपची तयारी आहे.भाजपला जर विधानसभेच्या १९ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या व अन्य दोन-तीन अपक्ष आणि मगोप वगळता अन्य छोटे प्रादेशिक पक्ष सोबत येत असतील, तर भाजप मगोपला सत्तेपासून दूर ठेवील, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. मात्र, निकालानंतर राजकीय परिस्थितीनुसार मगोपची साथ घ्यावी लागली, तर कोणत्याही शंकेशिवाय भाजपची पुन्हा मगोपशी युती होईल, असे अन्य एका नेत्याने सांगितले. भाजपचे राष्ट्रीय संघटक संतोष हे रविवार, दि. १२ रोजी गोव्यात दाखल होणार आहेत.गोवा सुरक्षा मंचसोबत मगोपची एक बैठक मंगळवारी पार पडली. त्याविषयी सुदिन ढवळीकर यांना बुधवारी विचारले असता, ते म्हणाले की, पुन्हा एक बैठक आम्ही गोवा सुरक्षा मंचसोबत घेऊ. निवडणूक निकालानंतर कोणती भूमिका घ्यावी ते मगोपने अजून ठरविलेले नाही; पण गोवा सुरक्षा मंचला त्यांची भूमिका काय असेल, ते अगोदर सांगा, असे मंगळवारी कळविले आहे. त्यानुसार पुन्हा आम्ही चर्चा करू. मगोपला १२पेक्षा जास्त जागा मिळतील. १३ जागा आम्ही जिंकू शकतो. मुख्यमंत्रिपदावर मगोप दावा करील.मगोपचे अध्यक्ष व आमदार दीपक ढवळीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आमच्यासाठी कुठलाच राष्ट्रीय पक्ष अस्पृश्य नाही; पण जो पक्ष मगोपच्या अटी मान्य करील, त्याच पक्षाला मगोप साथ देईल. आम्ही विविध पर्याय खुले ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे आम्ही प्रादेशिक पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू.(खास प्रतिनिधी)
भाजप-मगोप फेरयुतीचे संकेत
By admin | Published: March 09, 2017 2:12 AM