अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: उत्तर गोवालोकसभा मतदारसंघाचा विचार करता फोंडा तालुक्यातील चारपैकी हा एकमेव मतदारसंघ उत्तर गोव्यात येतो. गोविंद गावडे हे सलग दोनवेळा येथे आमदार निवडून येत आहेत. पहिल्यांदा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. गोविंद गावडे यांना त्यावेळी भाजपने पाठिंबा दिला होता. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वतः भाजपमध्ये आले व भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झाले. त्या अगोदर या मतदारसंघावर तसा मगोचा बोलबाला होता.
सध्या या मतदारसंघात भाजप पूर्णपणे सक्रीय दिसून येते. गेल्या काही निवडणुकांचा निकाल पाहता या मतदारसंघातील मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने भाजपविरोधी काम करूनसुद्धा येथे श्रीपाद नाईक यांनी लक्षणीय मते मिळवली होती, यावेळी मगो व भाजप हे दोन्ही पक्ष सरकारमध्ये आहेत.
उमेदवाराचे वाढणार बळ
मंत्री गोविंद गावडे यांना टक्कर देणारे एकमेव उमेदवार म्हणजे दीपक ढवळीकर. सध्या मगो पक्ष सरकारमध्ये असून सुदिन ढवळीकर मंत्रिपदी आहेत. साहजिकच त्यांना भाजपच्या उमेदवारासाठी काम करावे लागेल. मागच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता दोन्ही पक्षांनी मिळून सुमारे २१ हजार ८०० मते मिळाली होती. २०१७ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळून सुमारे २५ हजार ५०० मते मिळाली होती. ही सर्वच्या सर्व मते साहजिकच भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पारड्यात नक्कीच जातील.
मतदारांचा कौल कुणाकडे?
या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्य दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला येथे ४०० मते, तर २०२२ च्या निवडणुकीत फक्त ३०० मते मिळाली आहेत. राज्यस्तरावर चमकणारे वरद म्हार्दोळकर हे काँग्रेसचे नेते या मतदारसंघात राहतात. परंतु, त्यांची या मतदारसंघात काहीच पकड नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाने अडीच हजार मते घेऊन येथे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीसुद्धा ते भाजपच्या विरुद्ध काम करतील. परंतु विधानसभा निवडणुकीवेळी जेवढी मते पडली, तेवढी मते लोकसभा निवडणुकीला त्यांच्या उमेदवाराला मिळतील याची काही शाश्वती नाही. कारण विधानसभेचे मुद्दे वेगळे होते, लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात. आजच्या घडीचा विचार करता आज जर निवडणूक झाली, तर भाजपला येथे ९० टक्के मते सहज मिळू शकतील, असे वातावरण आहे.