लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य भाजप मंत्री, पक्षाचे आमदार, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तसेच कोअर टीममधील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
शनिवार १७ आणि रविवार १८ असे दोन्ही दिवस मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात भाग घेतला. त्यापूर्वी ते दोन दिवस दिल्लीतच होते. तेथे त्यांनी वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांची तसेच नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी असे ट्विट केले आहे कि, 'भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात 'विकसित भारत- मोदी की हमी' चा राजकीय ठराव मंजूर करण्यात आला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने गेल्या दहा वर्षात सर्वांगीण विकास पाहिला आहे. प्रत्येक हमी पूर्ण झाली आहे. १विकसित भारत- मोदी की हमी' हा १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा, पूर्तता आणि अभिमानाचा पुरावा आहे.'
दरम्यान, या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रचनात्मक विचार-विनिमय आणि धोरणात्मक नियोजन करण्यात आले. गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या अधिवेशनामुळे आणखी उत्साह मिळाल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.