पणजी : गोव्यातील भाजपeचे संघटनात्मक काम कसे काय सुरू आहे, कामात सक्रियता किती आहे, पक्षाचे सदस्य केवळ कागदोपत्रीच आहेत की खरोखर तीन- चार लाख सदस्य पक्षाकडे आहेत, पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कशी वागणूक मिळतेय, सरकारविषयी कार्यकर्त्यांना काय वाटते, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पक्ष पोहचवतोय की नाही, या सगळ्याचा आढावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे घेणार आहेत. एकंदरीत गोव्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे मन नड्डा जाणून घेणार आहेत. त्यासाठी ते एखाद्या बुथवरही जाऊन पक्षाची बैठक घेतील.
येत्या २० रोजी नड्डा गोवा भेटीवर येत आहेत. नड्डा काही महिन्यांपूर्वी एकदा गोव्यात आले होते पण यावेळी ते अध्यक्ष या नात्याने येत आहेत. नड्डा हे देशाच्या विविध राज्यांचा दौरा करत आहेत. त्यांची मोठी जाहीर सभा गोव्यात होणार नाही. तथापि, ते जिल्हास्तरीय व बूथस्तरीय बैठक घेतील. भाजपाच्या कोअर टीमची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. त्यावेळी नड्डा यांच्या गोव्यातील काही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. नड्डा हे आमदारांची बैठक घेतील.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत त्यांची स्वतंत्र बैठक होईल. मात्र नड्डा हे विशेषत: गोव्यातील भाजपाचे संघटनात्मक काम कसे चाललेय, याचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. यापुढे चौदा महिन्यांनी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची व भाजपा कार्यकर्त्यांची किती सज्जता आहे, याचाही ते अंदाज घेतील. ते प्रत्यक्ष एखाद्या बुथवर जाऊ शकतात. एखादी जिल्हास्तरीय बैठक देखील ते घेऊ शकतात. गोव्यातील भाजपाचे जे नवे व जुने कार्यकर्ते आहेत व जे अनेक वर्षे पक्षासोबत निष्ठेने आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या भावना नड्डा जाणून घेणार आहेत.