लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या १६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा दक्षिण गोव्यात होणार आहे. शाह यांच्या जाहीर सभेनंतर भाजप 'सासष्टी मिशन' पुन्हा गतिमान करणार आहे.
दक्षिण गोव्याचीही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा चंग भाजपने बांधला असून त्यासाठी मोठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. केंद्रीय आयटी तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे भाजपने याआधीच दक्षिण गोव्याची जबाबदारी सोपवली आहे. शिवाय केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडेही विशेष जबाबदारी दिली आहे.
अमित शाह येत्या १६ रोजी गोवा दौऱ्यावेळी पक्षाचे आमदार, मंत्री, पदाधिकारी यांची बैठक घेऊन दक्षिण गोव्याची जागा जिंकण्याबाबत कानमंत्र देतील. हा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे असून फ्रान्सिस सार्दीन हे खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर यांचा सार्दीन यांनी पराभव केला होता. सावईकर हे त्याआधी २०१४ ते २०१९ या काळात खासदार होते. २०२४ च्या आगामी निवडणुकीत भाजप सावईकर यांनाच पुन्हा तिकीट देणार की, नवीन उमेदवार देणार हे पाहावे लागेल.
नेतृत्वाची कसोटी
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील साखळी पालिका निवडणूक स्वतः मुख्यमंत्री व भाजपसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. ही पालिका नेहमी काँग्रेसकडेच जाते. गेल्या पालिका निवडणुकीतही सगलानी गटाने या पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. फोंड्यात भाजपचे मंत्री रवी नाईक, मगोप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड यांची कसोटी लागणार आहे.
दोन्ही पालिका भाजपच जिंकणार
फोंडा आणि साखळी पालिका निवडणुकांसाठी भाजपचे बहुतांश उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अवधेच काही उमेदवार निवडण्याचे बाकी असून त्यासाठी चाचपणी चालू आहे. फोंडा आणि साखळी दोन्ही पालिका यावेळी भाजपच जिंकणार, असा दावा त्यांनी केला.
दोन काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले
दोन काँग्रेसचे आमदार भाजप प्रवेश करणार असल्याचे वृत्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, या निव्वळ अफवा आहेत. कोणीही भाजप प्रवेश करत नाही. तानावडे यांनीही या अफवा असल्याचे स्पष्ट करीत वृत्तास नकार दिला. ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे कर्नाटक दौऱ्यावर जाण्यासाठी अल्पकाळ गोव्यात होते. काँग्रेसच्या किंवा अन्य कुठल्याही पक्षाच्या आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झालेली नाही किंवा तसा प्रस्तावही नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"