लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : आगामी फोंडा नगरपालिका निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये विजय मिळविण्यासाठी आम्ही ठोस कार्यक्रम राबविला आहे. ही निवडणूक फोंडा नागरिक समिती या बॅनरखाली लढताना कृषिमंत्री रवी नाईक यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. या निवडणुकीत १३ उमेदवारांना भाजपने समर्थन दिले आहे. तर २ बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित प्रभागातही भाजप पुरस्कृत उमेदवारांचाच विजय होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कृषिमंत्री रवी नाईक, खासदार विनय तेंडुलकर, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी, रितेश नाईक व इतर उमेदवार हजर होते.
तानावडे म्हणाले की, आमची सुरुवात चांगली झाली आहे. आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यासाठी फोंड्यातील नागरिकांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. कृषिमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा शहराचा संपूर्ण कायापालट आम्हाला करायचा आहे. फोंड्याचा मास्टर प्लॅन आम्ही मार्गी लावणार आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. आमचे मंडळ येताच मास्टर प्लॅन संदर्भात ठोस कार्यवाही होईल. त्याचबरोबर पुढच्या २५ वर्षांत फोंड्याचे स्वरूप काय असेल? याचा विचार आतापासूनच करणार आहोत. त्याकरिताच आम्ही शिक्षित असे उमेदवार तुमच्यासमोर उभे केले आहेत.
फोंडा, साखळी बाकी
फोंडा शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. सर्व पालिकांवर सध्या भाजपचे नगराध्यक्ष आहेत. येत्या काही दिवसांत साखळी व फोंडा नगरपालिकांवरही भाजपचेच नगराध्यक्ष निवडून येतील. सर्व उमेदवारांना निवडून देऊन भाजपचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
असे आहेत उमेदवार
भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी यावेळी आपले भाजपने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये रॉय नाईक (प्रभात १), वीरेंद्र ढवळीकर (२), ज्योती नाईक (३), संदीप आमोणकर (४), रितेश नाईक (५), शौनक बोरकर (६), विद्या नाईक (८), रूपक देसाई (९), दीपा कोलवेकर (१०), प्रियांका पारकर (११), अर्शीत वेरेकर (१२), आनंद नाईक (१४), संपदा नाईक (१५) यांचा समावेश आहे. तर प्रभाग ७ व १५ मध्ये बिनविरोध निवड झालेली आहे.
२७ एप्रिलनंतर बोलेन
फोंड्यातील घडामोडींसंदर्भात सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नगरपालिका निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढविली जात नाही. तरीसुद्धी २७ एप्रिलनंतर यावर भाष्य करणे मला आवडेल.
आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने फोंडा नगरपालिकेत शतप्रतिशत भाजप असल्यास विकासाची गंगा येथे जोरात होऊ शकते. आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत. प्रत्येक उमेदवाराला मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे. फोंड्याचा विकास करताना प्रत्येक घटकाचा विश्वास संपादन करूनच विकास करण्यात येईल. - रवी नाईक, कृषिमंत्री
मतदार आमच्या पाठीशी
रायझिंग फोंडा पॅनेलचे प्रवर्तक डॉ. केतन भाटीकर म्हणाले, भाजपने जे तेरा उमेदवार जाहीर केले आहेत त्यांना माझ्या वैयक्त्तिक शुभेच्छा. आगामी निवडणूक ही चांगल्या वातावरणात कशी होईल, याचा प्रत्येक उमेदवाराने विचार करावा. शेवटी राजकारण हे चार दिवसांचे असते, हे प्रत्येक उमेदवाराने लक्षात ठेवूनच आपला प्रचार करावा. आम्ही जे उमेदवार दिले आहेत त्यांच्या पाठीशी मतदारांचा कॉल नक्कीच असेल. भाजपच्या अगोदरच आम्ही आमचे उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"