पणजी - भाजपाचे अनेक माजी मंत्री व माजी आमदार आता संघटीतपणे बंड करण्याच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. पक्षात आपल्याला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जातात अशा प्रकारची टीका सातत्याने केल्यानंतर भाजपाचे बहुतेक माजी आमदार व माजी मंत्री संघटीत झाले आहेत. त्यांनी येत्या गुरुवारी भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निवासस्थानी बैठक घेण्याचेही ठरविले आहे.
डिसोझा यांना मंत्रिमंडळातून गेल्या महिन्यातच डच्चू देण्यात आला आहे. डिसोझा यांनी यापूर्वीच्या काळात पर्रीकर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी भाजपाच्या सर्व माजी मंत्र्यांनी भेटावे असे ठरले आहे. तिथे पुढील कृती योजना ठरणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ भाजपा नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही बैठक बोलविण्यासाठी पुढाकार घेतला. बैठकीला माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, दिलीप परुळेकर, राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार गणेश गावकर, दामू नाईक, किरण कांदोळकर आदी अनेकजण उपस्थित असतील, असे सुत्रांनी सांगितले. स्वत: डिसोझा यांनी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भाजपामध्ये सध्या जे काही चालले आहे ते कुणालाच मान्य नाही व त्यामुळे आम्ही संघटीत होत आहोत असे डिसोझा यांनी सांगितले. भाजपच्या गाभा समितीची बैठक अलिकडेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी बोलावली गेली होती. त्या बैठकीवर पार्सेकर यांनी बहिष्कार टाकला होता. डिसोझा म्हणाले, की गाभा समित्याच्या बैठकांना अर्थ राहिलेला नाही. कारण तिथे सर्वानूमते निर्णय होतच नाहीत.
दरम्यान, भाजपाचे नेते तथा माजी उद्योग मंत्री महादेव नाईक हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावरून गोव्यात परतले. तेही पक्षाच्या काही निर्णयांवर खूप नाराज झाले आहेत. नाईक यांच्या शिरोडा मतदारसंघात आता विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. नाईक हे बंड करून भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.