लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष बनून भाजपने गड राखला. परंतु, चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर व मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत झाले. भाजपने ४० पैकी २० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस-फॉरवर्ड युतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजप सतत तिसऱ्यांदा गोव्यात सरकार स्थापन करणार आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत झाल्याने भाजपसाठी एका अर्थी ती नामुष्की ठरली. परंतु, सर्वांत जास्त जागा मिळाल्याने तेवढीच जमेची बाजू ठरली आहे. कवळेकर हे केपे मतदारसंघातून तर आजगावकर हे मडगाव मतदारसंघातून रिंगणात होते. २०१९ साली कवळेकर हे काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये, तर आजगावकर हे मगोपमधून भाजपमध्ये गेले होते. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उपमुख्यमंत्री आजगावकर यांचा पराभव केला.
साखळीत ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. हा कौल प्रस्थापिताविरोधी असल्याचे मानले गेले होते. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ६६६ मतांनी निसटता विजय मिळवला.
मी राज्यभर प्रचार करत होतो. परंतु, माझ्या स्वत:च्या साखळी मतदारसंघात वेळ देऊ शकलो नाही. माझ्यासाठी हे मोठे आव्हान होते. कार्यकर्त्यांनीच माझ्यासाठी प्रचार केला. मी कमी मताधिक्क्याने निवडून आलो, परंतु भाजप २० जागा मिळवून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला. तीन अपक्षांनी पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोव्यातील जनतेने भाजपला स्पष्ट जनादेश दिलेला आहे. कॉंग्रेस आमदार फोडण्याची गरज नाही असे देवेंद्र फडवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजपचे २० उमेदवार जिंकलेले आहेत. तसेच ३ अपक्षांनी आणि २ आमदार असलेल्या मगो पक्षाने भाजपला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपला घाई करण्याची कोणतीही गरज नाही.
घाई होती कॉंग्रेसला. त्यामुळे ते आपल्या उमेदवारांना घेऊन कुठे तरी थांबले होते. आता केंद्रीय संसदीय समिती गोव्यात एक निरीक्षक पाठविणार आहे. त्यांच्या उपस्थितीत गोवा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतरच राज्यपालांना भेटून सरकार बनविण्याचा दावा केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.