लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रत्येक राज्यात सत्ता मिळविणे हे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्या-त्या राज्यात काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपकडून 'बी टीम' उभी केली जाते. आरजीने तेच केले आहे. काँग्रेस स्वाभिमानी पक्ष असून, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केलेला नाही, अशी माहिती पक्षाचे नवे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
गोवा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी काल, बुधवारी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित वार्तालापावेळी ते बोलत होते. फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत आरजीमुळे काही मतदार संघांमध्ये काँग्रेसचा विजय हुकला. आरजीने काँग्रेसची मते घेतली. आता लोकसभेसाठीही या पक्षाने दोन्ही मतदार संघांमध्ये आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत? त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले की, भाजप प्रत्येक राज्यात एखादा पक्ष हाताशी धरतो आणि काँग्रेसची मते फोडतो. तेलंगणातही त्यांनी असाच प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नाही.
गेली दोन दिवस मी येथील आमदार, प्रदेश समितीचे पदाधिकारी, गटाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांना वैयक्तिकपणे भेटून येथील राजकीय स्थिती समजून घेतली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल काहीजणांनी चांगल्या सूचनाही केल्या.
अयोध्या सोहळ्यात भक्तीपेक्षा राजकारण जास्त
२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संघ- भाजपचा हा राजकीय प्रकल्प आहे. यात भाजपचा भवित्तभाव वगैरे काही नाही, असा आरोप करत फेटाळले आहे. त्याबद्दल ठाकरे म्हणाले की, भाजपकडून प्रभू श्रीरामचंद्राला राजकारणात ओढले जात आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.
राष्ट्रीयस्तरावर विरोधकांची 'इंडिया' आघाडी आकार घेत असल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. विरोधकांची ही आघाडी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, काँग्रेससुद्धा कधीच निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करत नाही. मल्लिकार्जुन खर्गेचे नाव मला वर्तमानपत्रांमधूनच समजले. - माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते