लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकार प्रत्येक निवडणुकीत खाण व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देऊन खाण अवलंबितांना फसवत असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या प्रवक्त्त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३५ हजार कोटींचा खाण घोटाळ्याचा आरोप केला होता. पण, या आरोपांचे नंतर काहीच झाले नाही. भाजप कोळसा, पक्षांतरावरही काहीच बोलत नाही. त्यांनी अगोदर यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळीचे इंडिया आघाडीचे प्रवक्ते तुलिओ डिसोझा, गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा आश्मा बी आणि आपचे उपाध्यक्ष संदेश तळेकर देसाई उपस्थित होते.
डिसोझा म्हणाले की, खाण घोटाळा ३५ हजार कोटी रुपयांचा असू शकतो, असे शाह आयोगाने म्हटले होते. २०१३ मध्ये भाजप सरकारने त्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. या तपासाचे पुढे काय झाले आणि त्यात कोणाचा सहभाग होता, हे सरकारने सांगावे. भाजपने काँग्रेसवर आरोप करून सत्ता बळकावण्यासाठी खाण घोटाळ्याचा वापर केला का, यावरही स्पष्टता द्यावी. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार कोळशाच्या प्रश्नावर एक शब्दही उच्चारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
संदेश तळेकर देसाई म्हणाले की, कोळसा हाताळणी बंद करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले असले तरी कोळसा हाताळणी सुरूच आहे. लोक कोळसा हाताळणीच्या विरोधात आहेत. पण, हे डबल इंजिन असूनही सरकारने कोळसा हाताळणीसाठी पर्यावरण मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केला.