मनोहर पर्रीकरांचा नेमका आजार जाहीर करा; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 01:46 PM2018-08-30T13:46:16+5:302018-08-30T13:55:39+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. मनोहर पर्रीकर उपचारांसाठी पुन्हा अमेरिकेत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही मागणी करण्यात येत आहे.
गोव्यात सरकार संविधानावर चालते की पर्रीकर यांच्या दादागिरीवर? असा प्रश्न उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केला. पर्रीकर हे गंभीर आजारी असल्याने मुख्यमंत्री बदलण्याची गरज आहे. परंतु बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून पर्रीकर पद सोडायला तयार नाहीत, असा आरोपही भिके यांनी केला. ते म्हणाले की, राज्यात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही चालली आहे. स्वातंत्र्यदिनी पर्रीकर यांनी झेंडावंदनाची जबाबदारी कुठल्याही अन्य मंत्र्याकडे न देता सभापतींकडे सोपवली.
पर्रीकर हे मनमानी करत आहेत. सरकार म्हणजे त्यांच्या घरातील कंपनी नव्हे, त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य कोणाकडे देण्याचे टाळले आहे, असा आरोपही भिके यांनी केला. ते पुढे म्हणाले की, 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडे 17 आमदार आले असतानाही भाजपने सत्ता चोरली आणि घटनाबाह्य सरकार स्थापन केले. पर्रीकर मंत्रिमंडळातील अन्य तीन मंत्रीही आजारी आहेत परंतु मुख्यमंत्री बदलण्याची गरज आहे. याचे कारण जनतेला मुख्यमंत्रीपदी सदैव कार्यरत असलेली व्यक्ती हवी आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी परी कर अमेरिकेला उपचारासाठी गेले होते. परंतु अर्थसंकल्पाला हजर राहिले आणि थोडक्यात अर्थसंकल्प गुंडाळला. त्यांच्या आजाराबद्दल माहिती लपविली जात आहे. पर्रीकर यांनी आता मुख्यमंत्रिपद सोडण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून या पदाचा त्याग करावा अशी मागणी भिके यांनी केली.
दरम्यान, मुंबई येथील लीलावती इस्पितळातून गुरुवारी पहाटे पर्रीकर अमेरिकेला पुढील उपचारासाठी गेले आहेत. मुख्यमंत्री नसल्याने प्रशासन कोलमडले असल्याची भावना विरोधी पक्षांची झालेले आहे. कामे ठप्प झाल्याने जनतेमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.