ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 6 - गोव्यातील सत्ताधारी भाजप विरोधात लढण्यासाठी स्थापन केलेला गोवा प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त केल्याची घोषणा या प्रांताचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सोमवारी येथे केली. संघाच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरू नका, असा स्पष्ट संदेश गोव्यातील या घटनेने भाजपला राज्यात आणि केंद्रात दिल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपच्या दबावाखाली येऊन संघाने वरिष्ठ पातळीवरून जरी निर्णय घेतले तरी सिद्धांतावर विश्वास असलेले स्वयंसेवक असे निर्णय स्वीकारणार नाहीत. नाशिकला स्वयंसेवकांमध्ये झालेला उठावही गोव्यातील घटनेनंतरच झालेला होता हे लक्षात घ्या. प्रांत, जिल्हा आणि राज्यातील बारा तालुक्यांतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर केला. सर्व स्वयंसेवकांना शाखेवर जाण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सरकारतर्फे दिले जाणारे अनुदान बंद करावे, यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले होते. त्यात संघाचा कोकण प्रांत आडकाठी आणत असल्याचे भाभासुमंचे म्हणणे होते. संघाने गोव्याचे तत्कालीन संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरूनही हाकलले होते. परिणामी त्यांच्यासह गोव्यातील सर्वच संघ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी कोकण प्रांताची संलग्नता तोडून गोवा स्वतंत्र प्रांत म्हणून घोषित केला होता. सप्टेंबर २०१६ मध्ये स्थापन केलेला गोवा प्रांत सहा महिने अस्तित्वात होता. (प्रतिनिधी) चौकट धुसफूस आणि विलंब निवडणुका झाल्यानंतर प्रांत बरखास्त करण्याचा निर्णय जरी प्रांत स्थापन करतानाच घेतलेला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा काही कार्यकर्त्यांनी बैठकीत वेगळे सूर लावले होते. कार्यकर्त्यांत धुसफूस होती. एवढ्यात लवकर बरखास्ती नको म्हणणारेही काहीजण होते, पण वेलिंगकर हे जो काही निर्णय घेतील त्याला साथ देण्याची तयारी सर्वांनी दाखविली होती. त्यामुळे सर्वांचे सहमत घडवून आणण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ गेला.
संघ कार्यकर्त्यांना भाजपने गृहीत धरू नये - सुभाष वेलिंगकर
By admin | Published: March 06, 2017 8:31 PM