लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवार शोधा, असे निर्देश केंद्रीय नेत्यांनी दिल्याने भाजपकडून आता महिला उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. आज सोमवारी पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होत असून त्यामध्ये यावर चर्चा होणार आहे.
दक्षिणेतून चंद्रकांत (बाबू) कवळेकर, नरेंद्र सावईकर व दामू नाईक अशी तीन नावे केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवली होती. ही तिन्ही नावे फेटाळण्यात आली. एखादी सुशिक्षित महिला शोधा, कुणा मंत्री किंवा आमदाराच्या पत्नीचे नाव नको, असे पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना सांगितले
आजवरची परिस्थिती
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर नेहमीच काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. सध्याही फ्रान्सिस सार्दिन हे काँग्रेसचेच खासदार या मतदारसंघात आहेत. २०१९ साली अॅड. नरेंद्र सावईकर व त्याआधी १९९९ ते २००४ या कालावधीत १३ व्या लोकसभेत रमाकांत आंगले, असे दोनवेळा हा मतदारसंघ भाजपकडे होता. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ यावेळी काबीज करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. यावेळी महिला उमेदवार देऊन तिला निवडून आणण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसमोर असणार आहे.
...म्हणून महिला उमेदवारीसाठी भाजपश्रेष्ठी आग्रही
भाजप राजकारणात महिलांना समान संधी देतो, हे दाखवण्यासाठी: गोवा हे उत्तम उदाहरण आहे. येथील दोन जागांपैकी एक महिला उमेदवाराला देऊन महिलांची मने जिंकण्याचा प्रवल आहे. देशभरात भाजप महिलांना समान संधी दिल्याचा प्रचार करील. शनिवारी भाजपने श्रीपाद नाईक उत्तर गोवा मतदारसंघासाठी यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली, परंतु, दक्षिणेची तिकीट जाहीर होऊ शकली नाही. त्यासाठी आणखी पाच ते सहा दिवस जातील, असे सांगण्यात येते.
'पीएम'नी पाहिली नावे
गोवा भाजपने पाठवलेली तीन इच्छुक पुरुष उमेदवारांची नावे पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पाहिली, पंतप्रधानांकडे भाजपचे अंतर्गत सर्वे अहवालही पोहोचत असतात. तुम्ही पाठवलेली तिन्ही नावे नको, महिला उमेदवार शोधा, अशी सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्री सावंत यांना केली. उत्तर गोव्यातही यावेळी उमेदवार बदलण्याचा भाजप श्रेष्ठींचा विचार होता, पण मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आग्रहच धरल्याने श्रीपाद नाईक यांना तिकीट मिळाले.