पणजी : मांद्रेतील सभा यशस्वी ठरल्यानंतर भारतीय भाषा सुरक्षा मंच साखळीत शनिवारी, ३० रोजी जाहीर सभा घेणार आहे. या सभेबाबत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न शासकीय स्तरावरून होत आहे. सभा रोखण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही न्यायालयीन अटक करून घेऊ, असा इशारा भाषा मंचचे नेते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला. वेलिंगकर यांच्याकडील संघ प्रमुखपद भाजप नेते काढून घेऊ शकणार नाहीत, असा इशाराही तिसवाडी तालुका संघ कार्यवाह राजू सुकेरकर यांनी देऊन भाजपला शिंगावरच घेतले. भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे वेलिंगकर, सुकेरकर, पुंडलिक नाईक, अरविंद भाटीकर, पांडुरंग नाडकर्णी, नागेश करमली, सुभाष देसाई यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मांद्रेत झालेल्या सभेस सुमारे चार हजार लोकांची गर्दी झाली व सगळे लोक मांद्रे मतदारसंघातील होते. सरकारने व भाजपच्या काही नेत्यांनी सभा होऊ नये म्हणून सगळे प्रयत्न केले; पण कशाचीही पर्वा न करता लोकांनी सभा यशस्वी केली. त्यात बहुतांश युवकच होते. मुख्यमंत्री कदाचित सभेस येतील, असे वाटल्याने आम्ही मांद्रेतीलच लोकांना सभेसाठी बोलावले होते, असे वेलिंगकर म्हणाले. सभेसाठी साखळीतील रवींद्र भवनची जागा अगोदर आम्हाला दिली होती. ती अचानक नाकारली गेली. आम्ही आता वसंत नगरमध्ये सभा घेऊ. त्यातही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होत आहे; पण आम्ही आता गप्प राहणार नाही. कोणत्याही स्थितीत साखळीत सभा घेऊ व प्रसंगी न्यायालयीन अटक करून घेऊ, असा इशारा वेलिंगकर यांनी दिला. भाजपकडून वेलिंगकर यांचे संघप्रमुखपद काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता, ते शक्यच नाही, असे सुकेरकर यांनी सांगितले. भाजपचे नेते संघाच्या एखाद्या कार्यकर्त्यालादेखील हटवू शकणार नाहीत, असे वेलिंगकर म्हणाले. गोवा म्हणजे नागालँड नव्हे. सांगे, शिरोडा, मये येथे सभा होतील. भाजपच्या ताब्यातील सर्व २१ मतदारसंघांत प्रथम सभा होतील, असे वेलिंगकर यांनी सांगितले. २0११ मध्ये न्यायालयाने माध्यम बदल व अनुदान बेकायदा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे १३६ शाळा अनुदान बंद केल्यास कोर्टात जातील व स्थगिती मिळवतील, या पर्रीकर यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे पांडुरंग नाडकर्णी यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
आरएसएसने घेतले भाजपला शिंगावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 2:18 AM