केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सध्या भावनिक कोंडमारा होत आहे. ते भाजपच्या कोअर बैठकीत परवा जे काही बोलले, त्यावरून त्यांची मनःस्थिती स्पष्ट कळून आली. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना तिकीट नाकारले जाईल असा संभ्रम पक्षातीलच काहीजण निर्माण करत असल्याची त्यांची भावना झाली आहे. आपण पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलो असून तिकीट द्यावे की देऊ नये ते केंद्रीय नेतृत्वाला ठरवू दे, पण कुणी संभ्रम निर्माण करू नये व आपला अपमानही करू नये, अशा शब्दांत श्रीपादभाऊ बैठकीत व्यक्त झाले.
मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी भाऊंच्या भावना समजून घेतल्या. भाऊंचा स्वभाव नम्र व प्रेमळ आहे. मात्र अलीकडे त्यांना थोडे आक्रमक व्हावे लागत आहे. भाऊंचा कोंडमारा होतोय हे हिंदू बहुजनांना आवडत नाही. अर्थात, यात दोष गोव्यातील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा नाही. मुख्यमंत्री सावंत तर भाऊंचा खूप आदर करतात. त्यामुळेच यापूर्वी गोवा सरकारने एक परिपत्रकही जारी केले व यापुढे केंद्रीय निधीतून साकारणाऱ्या प्रकल्पांच्या पायाभरणी व उद्घाटन सोहळ्यांना श्रीपाद नाईक यांना निमंत्रित करायलाच हवे, असे सर्व खात्यांना बजावले, तरीदेखील भाऊंची घुसमट होते, कारण काही घटक छुप्या पद्धतीने कारवाया करत असावेत. निदान श्रीपाद भाऊंच्या समर्थकांना तरी तसेच वाटते.
दोनापावल जेटीच्या उद्घाटनावेळी पर्यटन खात्याने श्रीपाद नाईक यांना निमंत्रित केले नव्हते. त्यावेळी भाऊंनी जाहीर संताप व्यक्त केला होता. दुसऱ्यादिवशी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी माफीही मागितली होती. परवा बैठकीत भाऊ बोलले त्यावेळीही मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी त्यांचे शंका निरसन केले. शेवटी तुम्हाला तिकीट द्यावे की नाही ते भाजपचे केंद्रीय नेतृत्त्वच ठरवणार आहे, पण आम्हाला विचारतील तेव्हा आम्ही उत्तर गोव्यासाठी पहिले नाव तुमचेच सुचवणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या मनात तुमच्याविषयी पूर्ण आदर आहे, असेही सावंत व तानावडे यांनी स्पष्ट केले. भाऊंच्या वाट्याला आज जी घालमेल आलेली आहे, त्यामागे सध्याची देशभरातील भाजपअंतर्गत स्थितीही कारण आहे. सर्व निर्णय दिल्लीतच होतात. म्हादई पाणीप्रश्नी निर्णय घेतानाही श्रीपादभाऊंना विचारले गेले नव्हते.
कर्नाटकमध्ये तिकीट वाटप करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काहीजणांचे पत्ते कापले. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातही भाजपने आपले काही उमेदवार बदलले होते. येत्या लोकसभा निवडणुकीवेळीही देशभर काहीजणांचे पत्ते भाजप कापणार आहे. या पार्श्वभूमीवर काहीजण उत्तर गोवा मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढवतात. मात्र भाऊंचे तिकीट नाकारण्यासारखे मोठे काही घडलेले नाही असे वाटते. श्रीपादभाऊ सातत्याने उत्तर गोव्यातून जिंकतात. त्यांच्याकडे मनोहर पर्रीकर यांच्यासारखा करिश्मा नाही, त्यामुळे काही कामे त्यांच्याकडून कदाचित होत नसावीत, काम घेऊन जाणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांचा थोडा अपेक्षाभंगही होत असावा. त्यातून अफवा पिकतात. मात्र आजदेखील उत्तर गोव्यात श्रीपादभाऊंसारखा प्रबळ उमेदवार भाजपकडे नाही हेही मान्य करावे लागेल. तिकीट दिले नाही तरी, श्रीपाद नाईक कधीच बंड करून अपक्ष लढणार नाहीत. ते संघ विचारांतून भाजपमध्ये आले. भाजप गोव्यात जेव्हा बाल्यावस्थेत होता तेव्हा श्रीपादभाऊंनी घेतलेले कष्ट विसरता येणार नाहीत.
२००२ साली प्रमोद महाजन यांनी अचानक श्रीपाद नाईक यांना गोव्यात चला व फोंड्यातून विधानसभा निवडणूक लढा असे सांगितले तेव्हा केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते गोव्यात आले. रवी नाईकांविरुद्ध आपण पराभूत होणार हे ठाऊक असूनही फोंड्यातून भाऊ लढले होते. त्यामुळे श्रीपाद नाईक यांचा कोंडमारा न करता लोकसभेच्या तिकिटाविषयी त्यांचा विचार प्रथम करावा, ही अजूनही गोव्यात अनेकांची भावना आहे. उत्तर गोव्यात भाजपकडे आज आमदारांची संख्या खूप आहे व संघटनात्मक शक्तीही मोठी आहे. मात्र श्रीपादभाऊंना तिकीट नाकारणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला परवडणारे नाही, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"