लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: लोकसभेची दक्षिणेतील जागा काँग्रेसने जिंकली असल्याने गोव्यातील काँग्रेस पक्ष उत्साहित झाला आहे, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी निराश न होता निवडणुकीदरम्यान दाखवलेल्या उत्साहाच्या बळावर भाजपा विधानसभा निवडणुकीत विजयी प्राप्त करून पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार मानण्यासाठी उत्तर गोव्यातील म्हापसा येथील कार्यालयात भाजपचे मतदार संमेलन संपन्न झाले. संमेलनात उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. दक्षिणेतील जागा काँग्रेस पक्षाला मिळाली म्हणून कार्यकर्त्यांनी निरुत्साहित होऊ नये. निवडणुकीनिमित्त एकत्रित आलेल्या इंडिया आघाडी विरोधात राज्यातील एकण ४० मतदारसंघापैकी भाजपने २७ मतदारसंघातून आघाडी प्राप्त केली. काही मतदारसंघात तर अवघ्या मतांचा फरक झाला. त्यामुळे लोकसभेत दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर भाजपा पुन्हा विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येईल ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनी दाखवलेल्या विश्वासासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच भाजपच्या डबल इंजिन सरकारने केलेला विकास मतदारापर्यंत पोहोचवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या मतदार संमेलनावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री निळकंठ हळर्णकर, दामू नाईक सिद्धार्थ कुंकळ्ळेकर तसेच डतर नेते उपस्थित होते.