लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फोंडा मतदारसंघाचा विचार करता इथे भाजपच्या उमेदवाराला मगोची साथ ही गरजेची आहे. कारण फोंडा मतदारसंघात राजेश वेरेकर यांच्यामुळे काँग्रेससुद्धा चांगलीच बळकट बनलेली आहे.
भाजपचे रवी नाईक हे कृषिमंत्री असल्यामुळे भाजपसाठी ती जमेची बाजू आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीत जी मते वेगवेगळ्या उमेदवारांना मिळाली होती. त्याचासुद्धा वेगळा अभ्यास हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने व्हायला हवा. अवघ्या ७० मतांनी रवी नाईक किंवा भाजप येथे निवडून आला होता.
आज त्यांच्याकडे तीन पंच सदस्य आहेत, मुख्य म्हणजे निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपले पाच पंच निवडून आणले होते. परंतु, नंतर दोघे जाऊन भाजपला मिळाले. स्वहिमतीवर त्यानी जिल्हा पंचायत सदस्यसुद्धा निवडून आणला. नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या बॅनरवर सुदिन ढवळीकर किंवा दीपक ढवळीकर यांचे फोटो नसताना सुद्धा केवळ रायझिंग फोंडा हे नाव वापरून त्यांनी आपले पाच नगरसेवक निवडून आणले आहेत.
त्यामुळे फोंडा मतदारसंघात आघाडी मिळवायची असल्यास भाजपच्या लोकांना केतन भाटीकर यांनाच सोबत घेऊन जावे लागेल. राजेश वेरेकर यांनी आपल्या परीने काँग्रेस पक्ष बांधून घेतला आहे. खरे तर दक्षिण गोव्यासाठी उमेदवारीचा विचार करता राजेश वैरेकर हे नाव काँग्रेसने विचारात घ्यायला पाहिजे होते. भाजपला संपूर्ण तालुक्यामधून जर कडवी टक्कर कुठे मिळणार असेल तर ती फोंड्यातील काँग्रेसकडून मिळण्याची शक्यता आहे.
भाजपने येथे लोकसभेकरिता नेहमी आघाडी घेतली. सावईकर यांना डावल्यामुळे यावेळी भाजपच्या मुशीत तयार झालेले अनेक जण दुखावले गेले आहेत. मागच्य निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष राहिलेले संदीप खांडेपारकर यांची सुद्धा गरज आज भाजपला लागेल. कारण नरेंद्र सावईकर यांना उमेदवारी डावलल्याने आतल्या आत कार्यकर्त्यांची खदखद चालू झाली आहे. भाटीकर हे भाजपसाठी काम करतीलच. मात्र, रवी नाईक भाजपमध्ये आल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी केतन भाटीकर यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडलेली नसल्याचे दिसून येते.
या घटनांची नोंद महत्त्वाची
फोंडा मतदारसंघात भाजपची ५ हजार मते ही नक्की आहेत. विधानसभे- करिता रवी नाईक यांना ७,५१४ एवढी मते मिळाली तर मगोचे केतन भाटीकर यांना ७,४३७ एवढी मते मिळाली होती. रवी नाईक यांनी नेहमी १२ हजारांचा आकडा पार केला, असे असतानाही रवी नाईक हे विधानसभा निवडणुकीत सात हजारांच्या आसपास घुटमळत राहिले, हे नोंद करण्यासारखे आहे. केतन भाटीकर नवखे असतानाही फरक फक्त सत्तर मतांचा होता. त्याच्या मागोमाग काँग्रेसच्या राजेश वेरेकर यांनी ६,८३९ एवढी मते मिळवली होती.