पणजी : गोव्यात महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे गोव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गोव्यात भाजपने राज्यस्तरावर व सर्व मतदारसंघात गांधी जयंती बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांची 150 जयंती साजरी करताना एकूण तीन महिने कार्यक्रम राबविण्याचे ठरल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात भाजपाचे मंत्री, आमदार व प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहे.
भाजपने आपल्या सर्व आमदारांना या कार्यक्रमाची कल्पना दिली असून भाजपचे मंत्री, आमदारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी रात्री पणजीत पार पडली. त्यावेळी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या (बुधवारी) भाजपचे मंत्री, आमदार गांधी जयंती साजरी करतील. त्याचप्रमाणे दोन किलोमीटर पदयात्रा काढून गांधींविषयी जागृतीही करण्यात येणार आहे. यावेळी प्लास्टीक बंदीबाबतही नागरिकांमध्ये जागृती केली जाईल.
गोव्यातील शासकीय सोहळे, शासकीय बैठका अशा ठिकाणी प्लॅस्टीकच्या पाण्याच्या बाटल्यासोबतच प्लॅस्टीकचे ग्लास किंवा बश्या वापरायच्या नाहीत असा लेखी आदेश गोवा सरकारने दोन दिवसांपूर्वीच जारी केला आहे. पणजीतील मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या जहाजांमध्ये कॅसिनो जुगार चालतो. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने हा जुगार उद्या दिवसभर बंद ठेवला जाणार आहे. सरकारच्या गृह खात्याने तशी सूचना सर्व कॅसिनो व्यवसायिकांना करावी असे ठरविले आहे. अगोदरच कॅसिनो जुगारावरून भाजप सरकारवर विरोधी पक्ष व लोक टीका करत आहेत. तशाच गांधी जयंती दिनी तरी कॅसिनो जुगार सुरू ठेवायचा नाही हे सरकारचे धोरण आहे. गोवा सरकार जुनेगोवे येथे असलेल्या गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गांधी जयंती साजरी करणार आहे.