सदगुरू पाटील
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज वाढदिवस आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाहीय. या पार्श्वभूमीवर लाडक्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या हितचिंतकांनी देवाकडे केली आहे. आतापर्यंत साजरे करण्यात आलेल्या वाढदिवसांमध्ये पर्रीकर यांनी स्वतः पणजीतील भाजपा कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या-कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.
सध्या पर्रीकर आजारी असल्याने त्यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात पर्रीकर यांनी पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिराला गुरुवारी सकाळी भेट दिली. काही प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दोघांनीही देवीचे दर्शन घेतले. यावेळेस पर्रीकर यांच्या दीर्घ आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर दोघांनीही पर्रीकर यांच्यावतीने जनता आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी पणजीत गुरुवारी रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे. पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री असतानाही गोव्यातील भाजपा कार्यकर्ते व एकूणच गोमंतकीयांशी आपला संपर्क व संवाद सुरू ठेवला होता. वाढदिवसाला तर ते पणजीला यायचेच. यावेळी पर्रीकर हे प्रथमच शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वत: कुणाला भेटत नाहीत. पूर्वीच्या तुलनेत आता त्यांच्या आरोग्यात सुधारणा मात्र झालेली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही पर्रीकर यांना ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या. मी माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. अतिशय कष्ट घेण्याच्या स्वभावासाठी पर्रीकर प्रसिद्ध आहेत. पूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.