पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायतीच्या एकूण ५० मतदारसंघांमधून १९२ उमेदवार लढत आहेत. त्यापैकी १४५ हे अपक्ष असून त्यात सुमारे ५0 उमेदवार काँग्रेस समर्थक आहेत. भाजपमधून बंडखोरी करून एकूण ६ कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली व एकूण चित्र स्पष्ट झाले. सासष्टी तालुक्यातील दवर्ली मतदारसंघात सर्वाधिक १0 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे बंडखोर उमेदवार सत्यविजय नाईक यांचाही समावेश आहे. नाईक हे भाजपचे मंडळ अध्यक्ष होते. ते अपक्ष उमेदवार म्हणून आता भाजपच्या उमेदवाराविरुद्ध रिंगणात आहेत. ताळगाव, चिंबल, कारापूर-सर्वण, हळदोणे, सुकूर, पेन्ह द फ्रान्स, शिरसई, वेलिंग-प्रियोळ, नुवे व खोला या जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत आहेत. बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढती आहेत. मये, कुर्टी अशा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी सात, तर हणजूण, लाटंबार्से, कळंगुट अशा काही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी सहा उमेदवार रिंगणात आहेत. सत्तरी तालुक्यातील केरी मतदारसंघात सीताराम गावस या भाजप कार्यकर्त्याने बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी सादर केली आहे. लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघात दत्ताराम गाड व तुळशीदास गावकर हे भाजप कार्यकर्ते अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. सांकवाळमध्ये तुळशीदास नाईक या भाजपच्या मंडळ अध्यक्षाने बंडखोरी केली आहे. तो अपक्ष उमेदवार आहे. शेल्डे-केपेमध्ये रोझारिओ फर्नांडिस या भाजप नेत्याने आपल्या भावाच्या मुलीला अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. काही जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनीही बंडखोरी केली आहे. आपल्या पक्षातील बंडखोरांनी रिंगणातून माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी खूप र् प्रयत्न केले. काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनाही बोलणी करून उमेदवारांना मागे घेतले; पण सहा कार्यकर्ते रिंगणात कायम राहिले आहेत. (खास प्रतिनिधी)
भाजपचे ६ बंडखोर
By admin | Published: March 10, 2015 1:11 AM