पणजी : भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान येत्या १ ते ४ मार्च या कालावधीत गोव्यात होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे तब्बल ३० हजार लाभार्थी गोव्यात असून मुख्यमंत्री तसेच वेगवेगळे मंत्री, भाजपचे आमदार व प्रमुख कार्यकर्ते सर्व १७२२ बूथांवर फिरून लाभार्थींच्या गाठीभेटी घेतील व मोदींचे पत्र त्यांना देऊन लोकसभेत भाजप उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी लाभार्थी संपर्क अभियानचे प्रदेश प्रमुख तथा वास्कोचे आमदार दाजी साळकर, पक्षाच्या आयटी विभागाचे निमंत्रक माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर उपस्थित होते. तानावडे म्हणाले की, 'केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेले दहा वर्षात अनेक योजना जाहीर करून त्या यशस्वीरित्या अंमलातही आणल्या. जाहीरनाम्यातील योजना शंभर टक्के पूर्ण केल्या. 'मोदी की गॅरंटी' ती हीच होय. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने वेगवेगळ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या व मनुष्याचाही विकास केला'.
येत्या ६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महिलांकडे वर्चुअल पद्धतीने संवाद साधणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात मोठी स्क्रीन बसवणार असून या वर्चुअल संवाद कार्यक्रमात गोव्यातील महिलांनाही लाभ घेता येईल, असे तानावडे यांनी सांगितले. भाजपचे लोकसभा उमेदवार कधी जाहीर होणार, असे विचारले असता तानावडे म्हणाले की, गोव्यातील दोन्ही मतदारसंघातून उमेदवारांची नावे आम्ही केंद्रात पाठवलेली आहेत. अंतिम निर्णय तेथेच होणार आहे. आज गुरुवारी सायंकाळी मी व मुख्यमंत्री दिल्लीला जात आहे तेथेच केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक होईल आणि उमेदवार निश्चित होतील.
'चर्चिलचे नंतर पाहू...'दरम्यान, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, चर्चिल हे भाजपशी व आम्हा सर्वांशी चांगले संबंध असलेले सदोदित पाय जमिनीवर असलेले नेते होत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगावमध्ये आले होते तेव्हा ते त्यांच्या भाषणासाठी ते उपस्थित होते. चर्चिल आमचे चांगले मित्र व हितचिंतकही आहेत. कोणाचीही पर्वा न करता ते मनाला वाटते ते रोखठोक बोलतात परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाचा वगैरे कोणताही प्रस्ताव नाही. विधानसभा निवडणूक जवळ येताच नंतर पाहू. चर्चिल प्रमाणे अन्य अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक आहेत.'