फोंडा नगरपालिका निवडणुकीत तेरा प्रभागासाठी झालेल्या मतमोजणीत भाजपचे आठ, रायझिंग फोंडाचे चार तर एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले असून, काँग्रेसच्या पाच पैकी एकाही उमेदवाराला विजयी होता आलेले नाही. भाजप तर्फे रॉय नाईक, वीरेंद्र ढवळीकर, ज्योती नाईक, रितेश नाईक, शौनक बोरकर, रूपक देसाई, दीपा कोलवेकर, आनंद नाईक ह्या उमेदवारानी विजय संपादन केला तर रायझिंग फोंडा तर्फे वेदिका वळवईकर, प्रतीक्षा नाईक, शिवानंद सावंत व गीताली तळावलीकर यांनी विजय मिळवला व्यंकटेश नाईक हे एकमेव अपक्ष निवडून आलेले आहेत.
रवीचे दोन्ही पूत्र पास
संपूर्ण फोंडा वासियांचे लक्ष यंदाच्या निवडणुकीत रवी पुत्रांचे काय होते याकडे लागले होते. प्रभाग एक मध्ये रॉय नाईक यांनी रायझिंग फोंडाचा पराभव करून राजकारणात दमदार एन्ट्री केली तर प्रभाग पाच मध्ये रितेश नाईक यांनी एकतर्फे विजय मिळवत दुसऱ्यांदा नगरसेवक बनण्याचा मान मिळवला आहे.
रायझिंग फोंडाचे दुर्दैव
डॉ.केतन भाटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवलेल्या रायझिंग फोंडाचे दोन उमेदवार यावेळी कमनशिबी ठरले. प्रभाग तीन मधील शॅरील डिसोजा ही फक्त तीन मतांनी पराभूत झाली तर प्रभाग 10 मधील मनस्वी मामलेदार हि केवळ एका मताने पराभूत झाली. समान मते: प्रभाग 15 मध्ये यावेळी माजी नगराध्यक्ष गीताली तळावलीकर व माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची कन्या संपदा नाईक यांच्यात चुरशीची अशी लढत झाली होती. मतमोजणीत सुद्धा त्याचे पडसाद उमटले. दोघांनाही 402 अशी समान मते पडली. शेवटी चिठ्ठ्या टाकून विजयी उमेदवार घोषित करण्याचे ठरताच. दैवाने गीतालीला साथ दिली. परिणामी तळवलीकर या हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरल्या.
पहिल्यांदा नगरसेवक
रॉय नाईक ,ज्योती नाईक, शौनक बोरकर, प्रतीक्षा नाईकर रूपक देसाई, वेदिका वळवईकर, दीपा कोलवेकर हे सात नगरसेवक नवे चेहरे म्हणून ह्या कार्यकाळात नगरपालिकेत प्रवेश करणार आहेत.
विद्यमान नगरसेविकाला अकरा मते
प्रभाग चारमध्ये यावेळी विद्यमान नगरसेविका चंद्रकला नाईक ह्या पुन्हा उभ्या राहिल्या होत्या. परंतु मतदारांनी त्यांना साफ नाकारले. त्यांना केवळ अकरा मते प्राप्त झाली. त्यांना मिळालेली अल्पशी मते सध्या नगरपालिका क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
महत्त्वाचे पराभव
नगरपालिका राजकारणातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना यावेळी मतदारांनी झिडकारल्याचे आढळून आले. त्यामध्ये मगोचे प्रदेशाध्यक्ष मंगेश कुंडईकर, तीन वेळा निवडून आलेले विंसेन्त फर्नांडिस, मगोच्या केंद्रीय समितीचे सदस्य अनिल नाईक यांचा समावेश आहे.
यांनी राखले गड
नगरपालिकेत व्यंकटेश नाईक, रितेश नाईक, शिवानंद सावंत, आनंद नाईक व गीताली तळावलीकर, विरेंद्र ढवळीकर यांनी आपले गड राखले असून, माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी आपल्या पत्नीला निवडून आणले आहे तर माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी आपल्या कन्येला निवडून आणले आहे.
काँग्रेसचा सुपडा साफ
नगरपालिका निवडणुकीत राजेश वेरेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाच उमेदवार दिले होते. ते सर्व पाच उमेदवार पराभूत झाले. नमूद करणारी बाब म्हणजे काॅग्रेस गटाध्यक्ष विलियम आगियार यांच्या पत्नीला सुद्धा दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यांचे दोन उमेदवार जरी दुसऱ्या स्थानावर आले असले तरी ते मूळ काँग्रेसचे नसून दुसऱ्या पक्षातून काँग्रेसकडे आले होते. थोडक्यात नगरपालिका निवडणुकीच्या परिणामा नंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे.
सलग चौथ्यांदा विजय
नगरपालिका निवडणुकीतील दादा असलेले व्यंकटेश नाईक यांनी सलग चार विजय प्राप्त करून एक अनोखा विक्रम केला आहे. शिवानंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे चार वेळा निवडून येण्याचा मान मिळवला आहे. तीन वेळा ते निवडून आले आहेत तर मागच्या कार्यकाळात त्यांची पत्नी जया सावंत निवडून आल्या होत्या. निवडणुकीचा आढावा घेता भाजपचे प्रभाग 14 चे आनंद नाईक यांनी सर्वाधिक 612 मते मिळवली. त्याचबरोबर सर्वाधिक 415 चे मताधिक्य सुद्धा मिळवले आहे.