मडगाव : पाणी टाक्यांच्या वितरणातील घोटाळा प्रकरणात भाजप सरकारने आपल्या विरोधात नोंद केलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित आहे़ विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाला भारी पडू शकतो, या भयाने पछाडलेल्या सरकारने ८ वर्षांपूर्वीचे जुने प्रकरण उकरून काढले आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी शनिवारी येथे व्यक्त केली़ समर्थकांसह आलेमाव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचे संकेतही दिले. या प्रकरणी आपण यापूर्वीच विधानसभेत मंत्री या नात्याने स्पष्टीकरण दिले होते़ सुरुवातीला जरी काहीजणांना टाक्यांचे वितरण केले तरीही ही योजना नंतर पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आणली होती़ ही योजना तयार करताना कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नव्हता, असे आलेमाव म्हणाले़ हा विषय भाजपचे माजी आमदार दामू नाईक यांनी विधानसभेत गाजवला होता़ या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला होता़ यासंबंधी खुलासा करताना आलेमाव म्हणाले, ही योजना मी तयार केली नव्हती तर ती अभियंत्यांच्या साहाय्याने तयार केली होती़ मंत्री या नात्याने या योजनेला केवळ आपण प्रशासकीय मान्यता दिली होती़ या योजनेत जर काही त्रुटी राहिल्या असतील तर ती अभियंत्यांची चूक आहे़ सरकारला गुन्हा दाखल करायचाच आहे तर त्यांनी त्या अभियंत्यांवर करावा़ (प्रतिनिधी)
गुन्ह्यामागे भाजपचा राजकीय हेतू
By admin | Published: June 26, 2016 1:49 AM