पणजी : आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून गोवा प्रदेश भाजपामध्ये पूर्वतयारीचा जागर सुरू झाला आहे. पक्ष यंत्रणा सक्रिय केली जाऊ लागली असून, येत्या शनिवारपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू करणार आहेत.भाजपाच्या राज्यस्तरीय पदाधिका-यांनी दौ-याची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी काणकोणला भेट दिली व तयारीचा आढावा घेतला.सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काणकोणमध्ये जाऊन दौ-याचे सगळे नियोजन केले आहे. 13 रोजी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होईल. गुळे-करमलघाट येथे मुख्यमंत्र्यांचे भाजपाच्या युवा मोर्चाकडून स्वागत केले जाणार आहे. पावणे दहा वाजता आगोंद कम्युनिटी हॉलमध्ये मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. नंतर श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन देवस्थानला भेट देणे तसेच दुपारी 12 वाजता खोतीगाव पंचायत सभागृहात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील, असे पक्षाने जाहीर केले आहे.दुपारीही विविध पंचायत क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम होतील. पैंगीण, लोलये आदी भागांना मुख्यमंत्री भेट देतील. काणकोण पालिका सभागृहातही एक बैठक होईल. सायंकाळी सहा वाजता चावडी येथे भाजपाच्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल.काणकोणनंतर मग अन्य विधानसभा मतदारसंघांच्या दौ-यांचे भाजपाकडून नियोजन केले जाणार आहे. मे महिन्यापर्यंत सर्व चाळीसही मतदारसंघांत दौरा पूर्ण करायचा, असे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवले आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये विधानसभा अधिवेशन होणार आहे. तरीही मे महिन्यापर्यंत 30 ते 35 मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री दौरे पूर्ण करतील, असे भाजपाच्या पदाधिका-यांना वाटते.भाजपाला पुन्हा दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकायचे असल्याने आतापासून पक्ष फिल्डिंग लावू लागला आहे. त्यासाठी गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष मंत्र्यांनाही लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी कुठेच दुखवायचे नाही असे धोरण पक्षाने स्वीकारले असल्याची माहिती मिळते.मंत्र्यांच्या भेटी सुरूदरम्यान, भाजपाच्या मंत्र्यांनी पक्ष कार्यालयात बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे. मध्यंतरी नाताळाच्या सुट्टीनिमित्त हा कार्यक्रम बंद होता. गुरुवारी प्रथमच पंचायत मंत्री माविन गुदिन्हो हे भाजपाच्या येथील कार्यालयात उपस्थित राहिले. डिचोली, मये व अन्य काही मतदारसंघातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मंत्री गुदिन्हो यांची भेट घेतली. पंचायत क्षेत्रातील विकासकामांविषयीच्या अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. गुदिन्हो यांच्याकडे पशुसंवर्धन खातेही असल्याने त्याविषयीही काही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा गुदिन्हो यांनी जाणून घेतल्या. यापूर्वी वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक आदी भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटले होते. मुख्यमंत्री पर्रीकर हेही एक दिवस कार्यालयात उपस्थित राहिले होते.
लोकसभेच्या पूर्वतयारीचा भाजपामध्ये जागर, पक्ष यंत्रणा सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 7:50 PM