पणजी - काँग्रेसमधून जे अलिकडेच भाजपामध्ये आले आहेत, त्यांच्यासाठी व उर्वरित भाजपा मंत्री, आमदारांसाठीही भाजपाने नुकताच दोन दिवसांचा अभ्यास वर्ग घेतला. भाजपा हा कसा कार्यकर्त्यांचा व बूथ समित्यांचा पक्ष आहे हे भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून या अभ्यास वर्गात सर्वांना सांगितले गेले. तसेच नव्या आमदार व मंत्र्यांना शिस्तीचे आणि भाजपाचे तत्त्वज्ञान पुढे नेण्याचे धडे दिले गेले.
काँग्रेसमधून दहा आमदार भाजपामध्ये गेले आहेत. त्यातील एकटे विद्यमान भाजपा उपमुख्यमंत्री तर दोघे मंत्री आहेत. इतरांना सरकारी महामंडळे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपाचा मोठा पराभव झाला. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री होते. 2017 पासून आतापर्यंत भाजपाने काँग्रेसमधून तेरा आमदारांना भाजपामध्ये घेतले. त्या शिवाय मगो पक्षाच्या दोघा आमदारांना भाजपामध्ये प्रवेश दिला गेला. यामुळे भाजपाची आमदार संख्या तेरावरून सत्तावीसपर्यंत पुढे गेली. या सर्व सत्तावीस आमदारांसाठी भाजपाने निवासी स्वरुपाचा अभ्यास वर्ग घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि अन्य सर्व आमदार, मंत्री या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले.
भाजपाचे संघटन मंत्री सतिश धोंड यांनी सर्व मंत्र्यांना भाजपाच्या वाढीचा इतिहास सांगितला. गोव्यात आम्ही 1989 साली केवळ चौघांनीच प्रथम भाजपाचे काम सुरू केले होते. आता भाजपा सत्तेवर आहे. कारण आम्ही शिस्तीत भाजपाचे काम वाढवत नेले. सामुहिक प्रयत्नांमुळे भाजपाची वाढ झाली. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तुम्हा मंत्री, आमदारांना आम्ही प्रमुख कार्यकर्ते समजतो. तुमच्या मतदारसंघात बुथ स्तरापासून भाजपाची संघटना बांधा, कार्यकर्त्यांना कायम सांभाळा, अशी सूचना धोंड यांनी केली. दर निवडणुकीवेळी पन्नास टक्के आमदार पराभूत होतात व पन्नास टक्के नवे निवडून येतात. कारण कार्यकर्त्यांशी आमदारांचा संवाद संपलेला असतो, असे धोंड म्हणाले. 2022 साली गोवा विधानसभेच्या पुन्हा निवडणुका होतील तेव्हा भाजपाला विधानसभेच्या चाळीसपैकी तीस मतदारसंघ जिंकायचे आहेत, असे धोंड यांनी अभ्यास वर्गात सर्व आमदारांना सांगितले आहे.