लोकमत न्यूज नेटवर्क, हणजूण: म्हादई नदी हिला गोव्याची जीवनदायीनी म्हटले जाते, या नदीवरच गोवा उभा आहे. कर्नाटकने जर या नदीवर बांध घालून पाणी वळवण्याचा प्रयत्न केला, तर गोव्यातील जैवविविधता नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हणजूण- कायसूव जैवविविधता व्यवस्थापन समितीने गोवा जैवविविधता मंडळाच्या आवाहनानुसार म्हादई नदी वाचवण्यासाठी ठराव घेतल्याची माहिती हणजूण-कायसूव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी दिली.
हणजूण पंचायतीजवळ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य सत्यवान हरमलकर, संजय नार्वेकर व ऍस्टॉलिटा फर्नांडिस उपस्थित होते. म्हादई नदीच्या इतर उपनद्या गोव्यातून वाहत आहेत. या नद्यांचे पाणी गोव्याची तहान भागवत आहे. पाण्याचा प्रश्न किती जटील आहे म्हादईच्या रूपाने गोव्याला कळाले आहे. लोकांनी या समस्येचा ध्यास घेतला नाही तर भविष्यात त्यांच्या गळ्याला फास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी वाचवणे गरजेचे आहे. गोव्यातील बहुतेक पंचायतीच्या ग्रामसभातून म्हादई नदी वाचवण्यासाठी ठराव घेण्यात आलेला आहे. हणजण-कायसव पंचायतीने अद्याप ग्रामसभा आयोजित केलेली नसल्याने म्हादई नदीच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, अशी लेखी मागणी आपण पंचायतीकडे केली असल्याचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी यावेळी सांगितले.
मोठा धोका.....
कळसा-भांडुर प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प मार्गी लागल्यास गोव्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. त्याच बरोबर जैवविविधताही धोक्यात येणार असल्याचे यावेळी समितीने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"