लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कदंब बसस्थानकाजवळील जुने कोलवा सर्कल आणि माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुल रस्त्यासमोर शनिवारी दुपारी शेकडो आंदोलकांनी एकत्र येत मडगावचे रस्ते पूर्णपणे रोखून धरले. ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सुभाष वेलिंगकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी राजकारणी, समाज कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास दगड आणि इतर वस्तू टाकून आंदोलकांनी रस्ते अडवल्याने प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मडगाव शहरात वाहने अडविण्यात आली. तरुण, महिला, मुली आणि मुलांसह प्रवासी आंदोलकांनी प्रवास करण्यापासून रोखले होते.
पोलिसांकडून समजूत, तरीही आंदोलन सुरूच
सायंकाळी पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून संतप्त जमावाला शांत करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी नंतर जमावाला आश्वासन दिले की, वेलिंगकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत. पोलिसांनी वेलिंगकर यांच्या घरी शोध घेण्यासाठी गेले असता त्यांच्या पणजीतील घराला कुलूप होते, असा खुलासाही अधीक्षकांनी केला. सावंत यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगून आंदोलकांना मडगावचे रस्ते खुले करण्याची विनंती केली. ही विनंती आंदोलकांनी मान्य केली नाही. रात्री उशिरापर्यंत रस्ता रोखून धरला होता.
दरम्यान, पोलिस अधीक्षक सावंत यांची भेट घेणारे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आंदोलकांना सांगितले की, आपण पोलिस अधीक्षक सावंत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. ते म्हणाले, 'गेल्या चार दिवसांपासून हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले जात नसल्याने चिघळले आहे. पोलिस अधिकारी, डबल इंजिन असलेले भाजप सरकार हा प्रश्न सोडवण्यात आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. वेलिंगकर यांना अटक करून पोलिसांनी एक आदर्श ठेवायला हवा होता. गोव्यात कोणत्याही परिस्थितीत जातीय तेढ खपवून घेतली जाणार नाही, असे आलेमाव म्हणाले.
आमदार एल्टन डिकॉस्टा, म्हणाले की, कोणालाही इतर व्यक्तीच्या धर्मावर किंवा धार्मिक श्रद्धेवर प्रश्न विचारण्याचा किंवा टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. अशा गोष्टी केल्याने जातीय तेढ निर्माण होते. माझ्या मते वेलिंगकर यांना लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे.
केळशीचे सरपंच डिक्सन वाड़ा म्हणाले, वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. अशा गोष्टींचा मुख्यमंत्र्यांनी निषेध करण्याची गरज असल्याचे सांगितले. आम्हाला गोव्यात कोणताही जातीय तणाव नको आहे, त्यामुळे वेलिंगकर यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे.
पोलिसांवर आरोप
बाणवलीचे युवा नेते वॉरेन आलेमाव यांनीही वेलिंगकर यांना अटक करण्याच्या प्रक्रियेत पोलिस दिरंगाई करत असल्याची टीका केली. त्याला अटक लवकर व्हायला हवी असेही ते म्हणाले. आंदोलक संतप्त आहेत आणि त्यामुळे ते गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर आहेत, असे आलेमाव म्हणाले. आमदार विरेश बोरकर, माजी मंत्री मिकी पाशेको, वालांका आलेमाव, नेली फुर्तादो, प्रतिमा कृतिन्हो यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या अटकेची मागणी आंदोलनादरम्यान केली.