ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २६ - पणजीतील खाडी स्वच्छता मोहिमीचे निरीक्षण करताना होडी उलटल्यामुळे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि पत्रकारांसह ७ जण खाडीत पडले, परंतु सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले. ही घटना दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
सांतिनेज खाडीची स्वच्छता करण्याचे काम सुरू असून त्या कामाची पाहाणी करण्यासाठी महापौर त्या ठिकाणी गेले होते. मशिन वजा होडी असे त्या स्वच्छता मशिनचे स्वरूप आहे. महापौर आणि त्याचे सहकारी त्या मशिनवजा होडीवर बसूनच कामाची पाहणी करीत होते. माजी उपमहापौर लॉरेन्स बँतो आणि काही पत्रकारही त्यांच्याबरोबर होते.
काम चालू असतानाच होडी एका बाजूने कलंडली. त्यामुळे तोल सावरण्यासाठी होडीवरील लोकांची कसरत सुरू असतानाच ती पाण्यातच उलटली. त्यामुळे महापौरासह सर्वजण पाण्यात फेकले गेले. त्यानंतर बहुतेकजण स्वत:च वर आले तर राहिलेल्यांना सहका-यांनी वर काढले.
महापौराला नगरसेवक बेंतो यांनी हात देऊन वर काढले. मशिन ऑपरेटर बराच वेळ न दिसल्यामुळे चिंतेचे वातावरण होते, परंतु नंतर तो वर आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
वास्तविक हे विडिंग मशिन हे एक किंवा दोन व्यक्तींसह चालवायचे असते. त्यापेक्षा अधिक ताण घेण्याची त्याची क्षमता नाही. असे असतानाही त्यावर सात जणांना घेऊन जाण्याची जोखीम उचललीच कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे. या विडिंग मशिनवर येण्यासाठी महापौरानेच पत्रकारांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते.