लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: गोव्यासोबत कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देव बोडगेश्वरचा ३१वा वर्धापनदिन सोहळा दि. २३ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. उद्या ८९ वा महान जत्रोत्सव सोहळा साजरा होईल.
वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त सकाळी १० वा. मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३१वा वर्धापनदिन महोत्सव व दुपारी १ वा. महाप्रसाद होणार आहे. वर्धापनदिनानिमित्त देवाची चांदीची उत्सवमूर्ती विधीयुक्त पद्धतीने स्थापन केली जाणार आहे. पूर्वीची मूर्ती पंचधातूची होती. त्या जागी आता चांदीची सुमारे २ फुटी तसेच ७ किलो वजनाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. तसेच ७०० ग्रॅम वजनाचे सोनेरी कडे देवाला अर्पण केले जाणार आहेत.
वर्धापनदिनानिमित्त सायं. ७ वा. सुवासिनींतर्फे दीपोत्सव व रात्री ८.३० वा. ओम सत्य साई मंडळ म्हापसातर्फे प्रार्थना व भजनांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दारुकामाची आतषबाजी होईल, दुपारी ४ वा. १ ते ९ तसेच १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त भरणारी फेरी येथील आकर्षण असते. हजारांहून जास्त विविध प्रकारचे स्टॉल्स येथे उभारले जातात. उद्या ८९ जत्रोत्सव साजरा केला जाईल. १३ दिवसांच्या या उत्सवातील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले असते.