लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : देशाला शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे. मात्र, मुंबईपेक्षा गोव्याने ही परंपरा जपली आहे. शास्त्रीय संगीत हेच खरे संगीत आहे. परंतु, सध्या बॉलीवूडमधील संगीताचा दर्जा ढासळला आहे, अशी खंत ज्येष्ठ सिनेअभिनेत्री आशा पारेख यांनी व्यक्त केली.
कला आणि संस्कृती खाते, रवींद्र भवन मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कलारंग महोत्सवाचे काल अभिनेत्री आशा पारेख यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रख्यात तबलापटू सुरेश तळवलकर उपस्थित होते.
आशा पारेख म्हणाल्या, भारताला नृत्य आणि संगीताची मोठी परंपरा आहे. शास्त्रीय संगीत हाच मूळ गाभा आहे. आजही हे संगीत ऐकल्यास मन प्रसन्न होते. मात्र, सध्या बॉलीवूडमध्ये जे नृत्य शिकवले जाते त्यात विभत्सपणा अधिक आहे. शास्त्रीय नृत्य शिकणे कठीण आहे. परंतु, त्याची जागृती करण्याची गरज आहे. मुंबईपेक्षा गोव्यात शास्त्रीय संगीताची आवड लोकांना जास्त असून ही परंपरा कायमस्वरूपी जपा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत व राजेंद्र तालक यांनी आपले विचार मांडले व कलारंग महोत्सवाच्या कार्याची स्तूती केली.